कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबई महापालिकेनं आरजे मलिष्काच्या विडंबनात्मक गाण्यांचा मोठा धसका घेतलाय. पालिकेचा कारभार वेशीवर टांगणारे गाणे सलग तिस-या वर्षीही येवू नये, म्हणून पालिका आयुक्त प्रविण परदेशींनी मलिष्काला सोबत घेवून महापालिकेनं केलेल्या मान्सनपूर्व कामांची माहिती दिली.
मुंबई तुला माझ्यावर भरोसा नाय काय, मलिष्काच्या या गाण्यांनी महापालिकेचा कारभार पुरता वेशीला टांगला. मलिष्काचा एवढा धसका महापालिकेनं घेतला की नको रे बाबा मलिष्काची गाणी नकोत, म्हणून मलिष्काला विशेष आमंत्रण देत मान्सूनपूर्व कामं दाखवली. पालिका आयुक्त प्रविण परदेशी, अतिरिक्त महापालिका आयुक्त विजय सिंघल, आबासाहेब ज-हाड आणि आणि बड्या अधिका-यांची फौज मलिष्काच्या दिमतीला होती.
गेली दोन वर्षं मलिष्काच्या गाण्यानं मुंबईत धुमाकूळ घातला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भर पावसाळ्यात मलिष्काचं तिसरं गाणं आलं तर... पुढे काय वाढून ठेवलंय याचा अंदाज शिवसेनेला आला होता. विरोधकांनी मात्र यावर तोंडसुख घेतलं आहे. पण आता तरी मलिष्काला बीएमसीवर भरोसा आहे का, हे तिलाच माहीत.