मुंबई : केंद्र सरकारने देशवासियांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीतून जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरची एक्साईज ड्यूटी कमी केली आहे. यामुळे पेट्रोल 5 रूपयांनी तर डिझेल 10 रूपयांनी स्वस्त होणार आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.
देशात गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 115 वर तर दिल्लीत पेट्रोल 107.94 इतकं आहे. मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव 106.62 रुपयांवर तर दिल्लीत डिझेल 98.42 रुपये इतकं आहे.
पेट्रोलच्या तुलनेत डिझेलवरच्या उत्पादन शुल्कात दुप्पट कपात करण्यात आली आहे. याचा सर्वाधिक फायदा देशातील शेतकऱ्यांना होणार आहे. रबी हंगामाला सुरुवात झाली आहे. कृषी क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या उपकरणांसाठी डिझेलचा वापर होतो. डिझेल कपातीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलने 100 रुपयांचा पल्ला गाठला आहे. महानगरांमध्येही पेट्रोलने 110 रुपयांची पातळी ओलांडली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे महागाईही वाढली आहे.