अंकुर त्यागी, झी मीडिया, मुंबई : प्रदूषण ही जागतिक समस्या बनली असताना मुंबईतल्या एका संशोधक प्राध्यापकानं तब्बल ६५ लाख सौरदिवे तयार करून जगभरात वाटले. चेतनसिंह सोलंकी असं या प्राध्यापकाचं नाव असून ते भारताचे सोलर मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.
जगातली ६५ लाख कुटुंब सध्या सौर दिव्याच्या उजेडानं प्रकाशमान झाली आहेत. ही कमाल केली आहे मुंबई आयआयटीचे प्राध्यापक चेतनसिंह सोलंकी यांनी. चेतन सिंह यांनी अवघ्या शंभर रुपयात सौर दिवा तयार केला. फक्त सौरदिवा तयार करून ते थांबले नाहीत. तर हा दिवा वीज नसेल त्या घरात पोहचावा यासाठी त्यांनी उत्पादन आणि वितरण प्रणालीही उभारली.
महाराष्ट्रासह देशातल्या ९ हजार गावांमध्ये हे सौर दिवे पोहचले आहेत. त्यांनी सौर दिवा बनवण्यासाठी महिला आणि मुलांना प्रशिक्षण दिलं. सौरदिव्यासाठी लागणारे सुटे भाग पुरवले आणि सौरदिवा वितरणाची एक प्रणालीही उभी केली. सौरदिवा बनवणाऱ्याला १२ रुपये प्रतिनग तर विकणाऱ्याला प्रतिनग १७ रुपये मिळतात.
अंधारामुळं ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नव्हता त्यांना आता अभ्यास करता येऊ लागला आहे. तर अंधारात चाचपडणाऱ्या अनेक झोपड्या सौरदिव्याच्या प्रकाशानं उजळून निघाल्या आहेत. ही चळवळ तळागाळात पोहचावी यासाठी चेतनसिंह गांधी जयंतीच्या दिवशी आणखी एका विक्रमाला गवसणी घालणार आहे.
वीज निर्मितीसाठी जाळला जाणारा कोळसा आणि होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. अशा परिस्थितीत प्रदूषणविरहित वीज निर्मितीची चळवळ उभारणारे चेतनसिंह सोलंकी या सोलर मॅनला सलाम....