दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने इच्छूकांकडून उमेदवारी अर्ज मागवण्याचे ठरवले आहे. काँग्रेसच्या उमेदवारीकरिता ६ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत ठेवण्यत आली आहे. लोकसभेतील पराभवामुळे काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासही कुणी तयार होईल का? अशी चर्चा असताना काँग्रेसने उमेदवारीसाठी अर्ज मागवले आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रसला मोठा फटका बसला आहे. या पराभवानंतर काही काँग्रेस आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तर आणखी काही आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. या बाबी लक्षात घेऊनच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीच्या नियोजनाला सुरूवात केली आहे.
अशोक चव्हाण नियमितपणे विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजनाचा आणि पूर्वतयारीचा आढावा घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे लेखी अर्ज मागवले आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज ६ जुलै २०१९ पर्यंत ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर पश्चिम, मुंबई’ येथे पाठवायचे आहेत.