मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या घोषणेची औपचारिकता शिल्लक आहे. पण दुसरीकडं शिवसेना-भाजप युतीचं घोडं अजूनही अडलेलंच आहे. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीनं आघाडी करायची हे पक्क केलं आहे. राज्यातल्या ४८ पैकी ४४ जागांचं वाटपही झालं आहे. लवकरच काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची घोषणाही होण्याची शक्यता आहे. पण युतीचं अजूनही काही पक्कं झालेलं नाही. भाजपनं टाळीसाठी हात पुढं केला आहे. पण शिवसेना मोठा भाऊ म्हणून मान द्या या अटीवर अडून बसली आहे. त्यामुळं युतीचं काय होणार अशी चर्चा राज्यातल्या भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.
युतीचं घोडं अडलं कुठे ?
महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ राहील. भाजपकडून आम्हाला सन्मानजनक प्रस्ताव आला तर युतीचा विचार करू, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, आगामी निवडणुकीत युती करण्यासाठी भाजपकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मात्र, महाराष्ट्रात शिवसेना कायमच मोठा भाऊ राहील. हा मोठा भाऊ दिल्लीचे तख्त गदागदा हलवेल. मात्र, भाजपकडून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास शिवसेना युतीसंदर्भात नक्की विचार करेल. शिवसेना त्यावर सकारात्मक विचारही करेल. येत्या आठवड्याभरात यासंदर्भात निर्णय होईल, असे राऊत यांनी सांगितले. तसेच खुद्द उद्धव ठाकरे यांनी खासदारांना युतीचे संकेत दिल्याची चर्चा आहे. युती करायची की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घ्यावा, अशी भूमिका खासदारांनी बैठकीत मांडली. परंतु विधानसभा निवडणुकीत मोठ्या भावाचा मान मिळाला तर युती होऊ शकते, असे संकेत या बैठकीनंतर मिळाले.
प्रकाश आंबेडकरांबाबत आशावादी
दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी निश्चित झाली असली तरी प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आज महाआघाडीबाबत झालेली चर्चा निष्पळ ठरली आहे. जवळपास दोन तास चाललेल्या बैठकीतून कोणताच तोडगा निघालेला नाही. आघाडीबाबत चर्चा पुढे सरकली नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे. तर आंबेडकर आघाडीत सहभागी होतील याबाबत आपण आशावादी असल्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. संघाने देशात समांतर व्यवस्थापन राबवले आहे, त्याऐवजी घटनात्मक व्यवस्थापन असावे अशी आमची मागणी असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं. घटनात्मक व्यवस्थापनाबाबत काँग्रेसची स्पष्ट भूमिका असेल तर तर चर्चा पुढे सरकेल असंही त्यांनी नमूद केलं आहे.