मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्येला जाणार आहेत. मात्र त्यांच्या दौऱ्यावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा दौऱ्यात बरेच बदल करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी तयारी पूर्ण झालीय. उद्धव ठाकरे शनिवारी सहकुटुंब अयोध्येला जाणार आहेत.
सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री मुंबई विमानतळावरुन अयोध्येसाठी निघतील. सकाळी ११ वाजता ते लखनऊमध्ये पोहोचतील. अयोध्येतल्या पंचशील हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असेल. दुपारी ३.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद आहे. दुपारी ४ वाजता ते रामजन्मभूमीकडे जायला निघतील.
दुपारी ४.३० वाजता रामजन्मभूमी आणि रामलल्लाचं दर्शन झाल्यावर ५.३०च्या सुमाराला मुख्यमंत्र्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल. महत्त्वाचं म्हणजे कोरोनाचं सावट असल्यानं यावेळी शरयू आरती होणार नाही.
याआधी नोव्हेंबर २०१८ मध्ये राममंदिराचा निकाल येण्याआधी उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच अयोध्येला जात आहेत. महाविकासआघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याचं औचित्य साधत उद्धव ठाकरेंचा हा दौरा आयोजित करण्यात आलाय. शिवसेनेनं हिंदुत्व सोडलेलं नाही, हा संदेश अयोध्या दौऱ्यानिमित्त मुख्यमंत्री पुन्हा एकदा देणार आहेत.