मुंबई : राज्यात कोरोना (Corona) रूग्णसंख्या वाढत असताना मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udahv Thackray) यांनी आज टास्कफोर्सची (Task Force) बैठक बोलावली होती. या बैठकीत कोरोना संदर्भात टास्कफोर्ससोबत चर्चा करण्यात आली. वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि टास्कफोर्स यांच्यात झालेल्या या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांना आवाहन केलं आहे. राज्यात पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मास्क सक्ती नाही, परंतु घरातून बाहेर पडताना मास्क लावण्याचे लोकांना आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. पुढील 8 ते 10 दिवस महत्वाचे असणार आहेत. त्यानंतर आकडेवारी बघून निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
जर कडक निर्बंध नको असतील तर नियमांचे पालन करण्याचं आवानही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात सध्या तरी अडचण नाही. परंतु रूग्णसंख्या वाढल्यास 12 वर्षांखालील मुलांबाबत दक्ष राहावे लागेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
राज्यात कोरोनाची चौथी लाट (Corona Fourth Wave) येतेय की काय अशी भीती आहे. कारण राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दुप्पट वाढ झाली आहे. गेले अनेक दिवस हजाराच्या आत असलेली रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा पार केला आहे.
राज्यात काल कोरोनाच्या 1081 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत आढळली आहे. तर मुंबईत 739 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत शंभरच्या आसपास रुग्णसंख्या होती तिची आता हजाराकडे वाटचाल सुरू झालीय.