मुंबई: कोरोना (Coronavirus) विषाणूच्या संसर्गामुळे सध्या चीनमध्ये हाहा:कार उडाला आहे. आतापर्यंत चीनमधील हजारपेक्षा जास्त लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. या पार्श्वभूमीवर आता इंदू मिलमधील नियोजित स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा चिनी कंपनीकडून बनवून घेऊ नये, अशी मागणी पुढे आली आहे. त्याऐवजी हे कंत्राट एखाद्या भारतीय कंपनीला द्यावे, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.
चीनच्या वुहान आणि हुबेई प्रांतात सध्या कोरोना थैमान घालत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चीनमधील व्यापार आणि कामकाज ठप्प झाले आहे. ही सगळी परिस्थिती पाहता इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बनविण्याचे काम चिनी कंपनीकडून काढून घेण्यात यावे, अशी सूचना राहुल शेवाळे यांनी स्मारक परिसरात आयोजित केलेल्या बैठकीत केली.
या बैठकीला एमएमआरडीएचे अधिकारी, शिल्पकार अनिल सुतार, प्रकल्प सल्लागार शहापुरजी पालनजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे अध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचा पुतळा नको, पैसै वाडिया रुग्णालयाला द्या- प्रकाश आंबेडकर
काही महिन्यांपूर्वी इंदू मिल स्मारकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची २५० फुटांवरून ३५० फूट करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या पुतळ्याचे शिल्पकार राम सुतार हे असून प्रत्यक्ष पुतळा बनविण्याचे काम प्रकल्प सल्लागाराच्या वतीने 'ल्यू याँग' या चिनी कंपनीला देण्यात आली होती.
कोरोना : भारतीय विमानास परवानगी देण्याबाबत चीनची चालढकल
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे हादरलेल्या चीनमधील सर्व व्यापार आणि कारखाने ठप्प आहेत. यामुळे पुतळा बनविण्याच्या कामाला विलंब होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हे काम चिनी कंपनीला न देता एखाद्या भारतीय कंपनीला देण्याची सूचना खासदार शेवाळे यांनी केली. या बैठकीला उपस्थित असलेल्या संबधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अनुकूलता दर्शविली असून याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे.