कोरोनामुळे आईच्या पार्थिवावर ४० दिवसांनी अंत्यसंस्कार

अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल ४० दिवस वाट पाहावी लागली.

Updated: Mar 23, 2020, 10:57 PM IST
कोरोनामुळे आईच्या पार्थिवावर ४० दिवसांनी अंत्यसंस्कार title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरस (COVID-19) जगभरात थैमान घालत आहे. या व्हायरसच्या उत्पत्तीचे केंद्र असलेल्या चीनमधील व्यवस्था तर पूर्णपणे कोलमडली आहे. याच अनागोंदीमुळे पुनीत मेहरा यांना आपल्या आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल ४० दिवस वाट पाहावी लागली.

पुनीत मेहरा यांची आई रिटा या मेलबर्नहून मुंबईला येत होत्या. मात्र, विमानात त्यांना हदयविकाराचा झटका आला. त्यामुळे चीनच्या झेंगझोउ विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यानंतर रिटा मेहरा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. 

याच काळात कोरोना व्हायरस चीनमध्ये अक्षरश: हैदौस घालत होता. प्रत्येक दिवशी शेकड्याने लोक मृत्युमुखी पडत होते. रिटा मेहरा यांचा मृतदेह एका रुग्णालयात ठेवला होता. चिनी पोलिसांनी पुनीत मेहरा यांना जबाब देण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलवले. तेव्हा मृतदेहाचे शवविच्छेदन होण्यासाठी महिनाभराचा अवधी लागेल. तसेच भारतीय दुतावासाची परवानगीही लागेल, असे त्यांना सांगण्यात आले. आपले अंत्यसंस्कार भारतातच व्हावेत, ही रिटा मेहरांची इच्छा होती.  यानंतर पुनीत यांनी १२ दिवस आईच्या मृतदेहाचा ताबा मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

 

अखेर पुनीत मेहरा भारतात परतले. यानंतर त्यांनी भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्याशी संपर्क साधला. किरीट सोमय्या यांच्या पुढाकारने परराष्ट्र मंत्रालयातील चक्रे फिरली. मात्र, चीनमधील कोरोनाच्या कहरामुळे या प्रक्रियेत अडथळे येते होते. परंतु, चीन येथील भारतीय दुतावासातील अधिकारी अरविंद कुमार यांनी पुढाकार घेऊन सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. यानंतर पुनीत यांना आपल्या आईचे पार्थिव ताब्यात मिळाले. हे पार्थिव घेऊन ते मुंबईला आले. अखेर तब्बल ४० दिवसांनी पुनीत यांनी आपल्या आईवर अंत्यसंस्कार केले.