मुंबई : 'जीएसटी पद्धत फसली आहे. पंतप्रधानांनी चूक मान्य करून जीएसटी रद्द करून जुन्या करप्रणालीकडं जायला हवं', असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर टीका केली आहे. तसेच सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे पुढे या, आपण यावर चर्चा करु, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. कोणाच्या पैशातून बिहारला फुकट लस देत आहात? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
कर गोळा करण्याचा जो अधिकार आमच्याकडे होता. त्यावेळीही शिवसेना जीएसटीला विरोध करत होती. इथला पैसा दिल्लीत जाणार, मग दिल्ली सगळीकडे वाटणार. पैसा येत नाहीये. जीएसटी जर तुम्ही आम्हाला देऊ शकत नसाल, तर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मी या व्यासपीठावरून आवाहन करतोय की, पुढे या यावर चर्चा करूया. जीएसटीची जी काही कर पद्धत आहे, ती जर फसली असेल आणि मला वाटतं ती फसली आहे.
आमच्या हक्काचा पैसा आम्हाला मिळाला पाहिजे. तो मिळत नाहीये. पत्रावर पत्र दिली जात आहेत. त्या पत्राला केराची टोपली दाखवली जाते. ते जर पैसे मिळत नसतील. ही जीएसटीची पद्धत जर फसलेली असेल, तर मला वाटतं पंतप्रधानांनी सुद्धा प्रामाणिकपणे चूक मान्य करून त्यात सुधारणा केली पाहिजे, नाही तर पुन्हा जुन्या करप्रणालीवर जाण्याची गरज असेल, तर तसं त्यांनी केलं पाहिजे,” अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा साधेपणाने साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाच्या हॉलमध्ये दसरा मेळावा साजरा होणार आहे. १९६६ साली शिवसेनेचा दसरा मेळावा पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केला. शिवाजी पार्कवर हा दसरा मेळावा गेल्या पाच दशकांपासून साजरा होत आहे. ३० ऑक्टोबर १९६६ साली शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला. तेव्हापासून या दसरा मेळाव्याची परंपरा आहे.