मुंबई : शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या माजी मंत्री आणि आमदार असलेल्या दीपक केसरकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. 'राऊत यांची शिवराळ भाषा सहन केली जाणार नाही. कोणत्याही पक्षाला असा प्रवक्ता मिळू नये' असे केसरकर यांनी म्हटलं आहे. 'झी24तास'शी बोलताना त्यांनी आपले म्हणणं मांडलं.
सर्वोच्च न्यायालयात दाद
'विधिमंडळातील शिवसेनेच्या 55 आमदारांचे नेतृत्व सध्या एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे 14-15 आमदारांची बैठकीमध्ये त्यांना गटनेते पदावरून काढणं बेकायदेशीर आहे. विधानसभेच्या उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव असताना त्यांनाही आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार उरत नाही.'
'बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस ही नियमानुसार 7 दिवसांची असते. परंतू आम्हाला 48 तासांची देण्यात आली आहे. यासर्व बेकायदेशीर गोष्टींविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.'
संजय राऊत यांच्या भाषेवर टीका
'संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह भाषेवर बोलताना केसरकर म्हणाले की, असा प्रवक्ता कोणत्याही पक्षाला मिळू नये अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. कारण असे प्रवक्ते हे पक्षाचा नाश करतात. शिवसेनेत आज जी परिस्थिती निर्माण झाली त्याला राऊतांची वक्तव्य कारणीभूत आहेत.'
संजय राऊत यांच्याविरोधात आमदारांमध्ये संताप
'सर्व आमदारांमध्ये राऊतांविरोधात तीव्र संताप आहे. ते आमदारांच्या मतावर निवडून आले आहेत. आमदारांना प्रेत म्हणण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. राऊतांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या मदतीने निवडून यावं. त्यांना त्यांचा चांगला सपोर्ट आहे. त्यानंतर त्यांनी आमच्यावर बोलावं.'
'राऊतांनी किती बापाचे... असं आक्षेपार्ह विधान केलं. त्यामुळे त्यांनी महिलांचाही अपमान केला आहे. शिवसेनेसारखा छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालणाऱ्या पक्षामध्ये राहून राऊत अशी भाषा कशी वापरू शकतात? बाळासाहेब असतं तर एका मिनिटात मातोश्रीवरून राऊताना बाहेर काढलं असतं.'
बाळासाहेबांच्या विचारावर चालणार...
'शिवसेनेचे तत्व आणि बाळासाहेबांच्या विचारावरच आम्ही पुढे चालवणार आहोत. राष्ट्रवादीने आमचा पक्ष 4 वेळा फोडलाय. आजही ते हेच करताहेय. शरद पवार आणि उद्धव साहेबांच्या भेटीनंतर ही विधानं आहेत.'
'उद्धव साहेब म्हणतात, मी राजीनामा देतो. परंतू त्यांना आम्ही राजीनामा मागितलेलाच नाही. आम्ही राष्ट्रवादीची संगत नको. असं म्हणतोय. आमच्या मतदारसंघात आम्हालाच संपवण्याचं कारस्थान सुरू आहे. शिवसैनिकांमध्ये जो गैरसमज निर्माण केला जातोय. त्यातून त्यांनी बाहेर यायला हवं.'
भाजपसोबत जाणार का?
'आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही उद्धव साहेबांसोबतच राहणार, परंतू सरकार स्थापन करण्यासाठी भाजप मदत लागली तर आम्ही ती उद्धव साहेबांच्याच आशीर्वादाने घेणार. कारण भाजप आमच्यासाठी समविचारी पक्ष आहे.'