Maharashtra Elections 2022 : राज्यातील 17 जिल्ह्यात 92 नगर परिषदा आणि 4 नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणूका होणार होत्या. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकींचा कार्यक्रमही जाहीर केला होता. पण या सार्वत्रिक निवडणुका आता स्थगित करण्यात आल्या आहेत.
ओबीसी आरक्षणप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, त्यात काही महत्त्वाचा निर्णय आला तर निवडणुकीवर प्रश्नचिन्हा उपस्थित होऊ शकतो, याशिवाय वॉर्ड रचना आरक्षणाबाबतही महत्त्वाचा निकाल अपेक्षित आहे, त्यामुळे हे निकाल जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत या सार्वत्रिक निवडणुाक स्थगित करण्यात आल्या आहेत.
याशिवाय राज्यात सध्या अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती आहे, त्यामुळे निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी राज्य सरकारनेही केली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
92 नगर परिषदा आणि 4 नगरपंचायतींसाठी 18 ऑगस्टला मतदान होतं तर 19 ऑगस्टला मतमोजणी होती.
कोणत्या 17 जिल्ह्यात होणार होत्या निवडणुका
ज्या 17 जिल्ह्यात निवडणुका होणार होत्या त्यात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलडाणा यांचा समावेश होता.