मुंबई : एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एका १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. हा मुलगा दादर मार्केटमध्ये फुलं आणण्यासाठी गेला होता.
एलफिन्स्टन दुर्घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. या मृतकांमध्ये एक होता १४ वर्षांचा रोहित परब.
विक्रोळीतील अंकुश परब कुटुंबीय फुलांची विक्री करुन आपलं घर चालवत होते. अंकुश परब यांना दोन मुलं एक आकाश आणि दुसऱ्याचं नाव रोहित. फुल विक्रीचा व्यवसाय असल्याने ते दादर फुल मार्केटमध्ये फुलं खरेदी करण्यासाठी जात असतं.
नेहमीप्रमाणे शुक्रवारीही आकाश आणि रोहित फुलं खरेदी करण्यासाठी दादरला गेले होते. मात्र, दोघांपैकी रोहीत पून्हा परतलाच नाही.
शुक्रवारी आकाश आणि रोहित फुलं खरेदीसाठी घराबाहेर पडले. त्याच दरम्यान, एलफिन्स्टन येथे चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये रोहितला आपला जीव गमवावा लागला. तर अंकुश बेपत्ता होता. काही वेळाने अंकुशच्या वडिलांना आकाश रुग्णालयात असल्याची माहिती मिळाली. आकाश सुखरुप असल्याने अंकुश परब यांना आनंद झाला मात्र, त्याचवेळी रोहितचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती त्यांना मिळाली आणि त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.