कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 'बेस्ट'चे आर्थिक नुकसान

 'जो पर्यंत आमच्या मागण्याची पूर्तता होत नाही, तो पर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही' अशी स्पष्ट भूमिका बेस्ट कर्मचारी संघटनेनी घेतली आहे. 

Updated: Jan 8, 2019, 12:01 PM IST
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 'बेस्ट'चे आर्थिक नुकसान title=

मुंबई: बेस्ट कर्मचारी संघटनेने विविध मागणीसाठी काल मध्यरात्रीपासून (८ जानेवारी) संप पुकारला आहे. सुमारे ३० हजार कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचे कळते. ज्यामुळे बेस्टच्या जवळपास ३ हजार ३०० बस या मुंबईच्या रस्त्यावर धावणार नाहीत. परिणामी मुंबईकरांना या संपाचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. दररोज २७ ते ३० लाख प्रवासी बेस्टच्या बसने प्रवास करतात. आधीच तोट्यात असलेल्या बेस्ट प्रशासनाला या संपामुळे आर्थिक फटका बसणार आहे. बेस्ट प्रशासनाला त्यांच्या प्रवासी सेवेतून प्रतिदिन २ कोटी ७० लाख ते ३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संप अजून किती वेळ कायम राहिल, हे सांगणे कठीण आहे. 'जो पर्यंत आमच्या मागण्याची पूर्तता होत नाही, तो पर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही' अशी स्पष्ट भूमिका बेस्ट कर्मचारी संघटनेनी घेतली आहे. कर्मचारी कामावर लवकर परतले नाही, तर बेस्ट प्रशासनाच्या अर्थिक नुकसानीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

 

बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्या

 

१) २००७पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्माचाऱ्यांनामिळणाऱ्या रुपये ७३९० या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतननिश्चिती केली जावी तसेच एप्रिल २०१६पासून लागू होणाऱ्या नव्या वेतनकरारावर तातडीने काम सुरु करावे.

२) बेस्टचा ‘क’ अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात सामावून घेण्याबाबत मंजुरी देण्यात आलेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करावी. 

३) २०१६-१७ आणि  येणाऱ्या वर्षासाठी पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस, निवासस्थानाचा प्रश्न तसेच अनुकंपा भरती प्रक्रिया तातडीने सुरु करावी या मागण्या बेस्ट कर्मचारी संघटनेने प्रशासनासमोर ठेवल्या आहेत.