लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागाची अतुलनीय कामगिरी, दिवसभरात राज्यात विक्रमी लसीकरण

राज्याबरोबरच आज मुंबईतही उच्चांकी लसीकरण पार पडल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे  

Updated: Aug 21, 2021, 09:55 PM IST
लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागाची अतुलनीय कामगिरी, दिवसभरात राज्यात विक्रमी लसीकरण title=

मुंबई :  कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत दिवसभरात १० लाख ९६ हजार  नागरिकांना लस देण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. 

एकाच दिवशी सुमारे अकरा लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या अतुलनीय कामाची दखल मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली असून याबद्दल आरोग्य यंत्रणेनेचे कौतुक करीत अभिनंदन केलं आहे.

दिवसाला १० लाखापेक्षा अधिक लसीकरण केलं जाऊ शकतं  हे आज आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सिद्ध केले असून याहीपेक्षा अधिक लसीकरणाची क्षमता राज्याची असल्याचे आरोग्यमंत्री  टोपे यांनी सांगितलं. विभागाच्यावतीने त्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येतील असंही त्यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज संध्याकाळी  सातपर्यंत ५२०० लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून १० लाख ९६ हजार ४९३ नागरिकांना लस देण्यात आली. काही दिवसांपूर्वी राज्यातील  आतापर्यत दिलेल्या डोसेसची संख्या ५ कोटींवर गेली असून देशभऱात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे.

आज संध्याकाळी  सात वाजेपर्यंत दिवसभरात १० लाख ९६ हजार ४९३ नागरिकांचे लसीकरण झाले. यापूर्वी ३ जुलै रोजी ८ लाख ११ हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी कामगिरी नोंदविली होती त्यानंतर स्वातंत्र्यादिनाच्या पूर्वसंध्येला ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस देऊन राज्याने आधीचा विक्रम मोडला. आजच्या सर्वोच्च संख्येने झालेल्या लसीकरणानंतर एक नवा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले.

मुंबईतही आज उच्चांकी लसीकरण

मुंबईत आतापर्यंत ८५ लाख २ हजार ७७ कोरोना प्रतिबंधक लस दिली गेली आहे. त्यापैकी २१ लाख ६१ हार ९३९ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर ६३ लाख ४० हजार १३८ जणांना लसीचा एक डोस देण्यात आला आहे.