मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray ) यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेत 3 मे पर्यंत भोंगे काढण्याचा अल्टीमेटम दिला होता. भोंगे काढले नाही तर हनुमान चालिका लावणार म्हणजे लावणार अशी घोषणा राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी ठाण्याच्या जाहीर सभेत केली होती. सरकारने मौलवींसोबत चर्चा करुन भोंगे काढण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी त्यांनी सभेत केली होती. पण महाविकासआघाडी सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Home minister on loudspeaker of mosque)
मशिदी किंवा मंदिरांवरील परवानगी घेऊन लावलेले भोंगे काढणार नाही, अशी स्पष्ट भूमिका गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी जाहीर केली आहे. कोर्टानं परवानगी घेऊन लावलेले भोंगे काढण्याचा कोणताही आदेश दिलेला नाही, असंही त्यांनी सांगितलं. मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरेंनी ३ मे पर्यंतची मुदत सरकारला दिली होती. त्याबाबत गृहमंत्र्यांनी (Home Minister of Maharashtra) सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत स्पीकर लावू नये असा कोर्टाचा निर्णय आहे. भोंग्याचा मुद्दा सरकारने गांभीर्याने घेतला आहे. सगळ्या धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणार आहे. तेढ निर्माण होऊ देणार नाही. यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवणार असल्याचं देखील वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारच्या या भूमिकेमुळे आता राज ठाकरे आणि मनसे पुढे काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे यांनी आपली भूमिका बदलणार नाही असं आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे 3 मे नंतर मनसे विरुद्ध राज्य सरकार संघर्ष वाढण्याची चिन्ह आहेत.