दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : पोलिसांना सौजन्याने वागण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी वेळ आली तर पोलीस आपल्या पद्धतीने शिस्त लावण्याचे काम करतील असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. झी 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. नाकाबंदी सुरू असून वेळोवेळी आढावा घेऊन त्यात सुधारणा केल्या जात आहेत. सरकारमध्ये विचार सुरू आहे. परिस्थिती अशीच राहिली, लोक असेच रस्त्यावर आले तर निर्बंध अधिक कडक करावे लागतील असेही ते म्हणाले.
यावेळी अत्यावश्यक सेवेला परवानगी दिली आहे. सार्वजनिक वाहतूक सुरू ठेवलेल्याने त्यामुळे लोक बाहेर येतात. पण अत्यावश्यक कामासाठी आणि अत्यावश्यक सेवेतील लोकांनीच बाहेर यायला हवं असे गृहमंत्री म्हणाले.
संचारबंदीचे काटेकोर पालन होईल अशा प्रकारची व्यवस्था करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. निर्बंध विनाकारण लावलेले नाहीत ही बाब लोकांनीही लक्षात घेतली पाहिजे असे ते म्हणाले.
पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त त्याबाबत निर्णय घेतील. यासंदर्भात त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस रस्त्यावर आपल्यासाठी काम करतायत. जीव धोक्यात घालतायत, लोकांनी विनाकारण घराबाहेर पडून कोरोनाच्या वाढीला निमंत्रण देऊ नये असं आवाहन गृहमंत्र्यांनी केले.