Mumbai Weather Today: डिसेंबर आला असून राज्यात अनेकांना थंडीची चाहूल लाहलीये. डिसेंबर महिन्यात मुंबईत देखील नागरिकांना थंडीचा आनंद मिळतो. मात्र यंदाच्या वर्षी म्हणावी तशी थंडी मुंबईत पडलेली नाहीये. डिसेंबर महिना संपत आला असून अजूनही लोकांना काही प्रमाणात उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 3 डिसेंबरनंतर मुंबईमध्ये दिवसाचं तापमान 33 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवलं गेलं आहे.
मुंबईत जाणवणाऱ्या उष्णतेचे सर्वात मोठं कारण म्हणजे भारताच्या मध्यभागी तयार झालेली अँटी सायक्लॉन सिस्टम. यामुळे देशाच्या उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखले जातात. हवामान पाहता नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात त्यात घसरण होणार आहे, असा अंदाज आहे. मुंबईत 7 जानेवारीपासून तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी उपनगराचं कमाल तापमान 34.9 अंश सेल्सिअस होतं तर शहराचं 32.4 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आलं. शिवाय उपनगरात किमान तापमान 20.2 अंश सेल्सिअस तर शहरात 22.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं होतं.
डिसेंबर महिना आता जवळपास शेवटच्या टप्प्यात आला असला तरी थंडीच्या दिवसांत महानगरात उकाडा जाणवतोय. हवामानतज्ज्ञ राजेश कपाडिया यांच्या सांगण्यानुसार, संपूर्ण डिसेंबरमध्ये तापमान सामान्यपेक्षा केवळ 3 अंशांनी जास्त नोंदवण्यात आलं होतं. 24 नोव्हेंबरला सर्वाधिक 35.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये. याशिवाय किमान तापमानही सरासरीपेक्षा 4 अंश सेल्सिअसने जास्त असल्याची माहिती आहे.
प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक सुनील कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर जास्त नाही. राज्याच्या उत्तरेकडील कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.
पुण्यातील सर्वात कमी किमान तापमान यंदा 9 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं होतं. त्यामुळे म्हणावी तशी कडाक्याची थंडी जाणवली नाही. 2018 मध्ये मात्र 5.9 किमान तापमान झालं होतं. तशी थंडी यंदा पुणेकरांना अनुभवता आलेली नाही. या वर्षी किमान आणि कमाल तापमानात सतत चढ-उतार पहायला मिळाली असल्याचं, तज्ज्ञांचं म्हणणं आहे.