मुंबई: १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे. त्यापूर्वी काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी केवळ आजचा शेवटचा दिवस शिल्लक आहे. यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजच पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक करुन घ्या. जर तुम्ही आजच तुमचं पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक न केल्यास उद्या म्हणजे १ एप्रिलपासू ते रद्द होईल. सर्वोच्च न्यायालयानेच तसे आदेश दिले आहेत.
याशिवाय, जीएसटी परताव्यासाठीही आजचा शेवटचा दिवस शिल्लक आहे. आज आयकर तसेच जीएसटी परतावा न केल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. तिसरी आणि रोजच्या व्यवहारातली गोष्ट म्हणजे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या नियमानुसार टीव्ही चॅनेलचे पॅकेज निवडण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. जर आजच तुम्ही आवडीचे पॅकेज न निवडल्यास तुमची सेवा बंद होईल.
तसेच २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठीचा प्राप्तिकर भरण्याची मुदतही आज संपत आहे. इन्कम टॅक्स रिटर्न न भरल्यास एक हजार ते दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. मात्र करदात्याचे एकूण आर्थिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर दंडात्मक रक्कम एक हजार रुपयांपेक्षा अधिक नसेल. त्यासाठी प्राप्तिकर आणि जीएसटीची कार्यालये ३१ मार्च रोजी सुरु राहतील. प्राप्तिकर आणि जीएसटी कार्यालयांसोबत सरकारी बँका आणि रिझर्व्ह बँकसुद्धा रविवारी सुरू असतील.
तुम्ही १ एप्रिल नंतर नोकरी बदलणार असाल तर आपल्या जुन्या भविष्य निर्वाह निधीचे खात्यातून पैसे नव्या पीएफ खात्यामध्ये ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेतून मुक्ती मिळेल. ईपीएफओच्या नव्या नियमांनुसार, आपले नवे खाते स्वतःहून जुन्या खात्याशी जोडले जाईल. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या १२ आकडी युनिव्हर्सल अकाऊंट नंबरची मदत घेतली जाईल.