'भारत हिंदुंचा एकमेव देश, त्यालाच जाळाल तर उद्या कुठे जाल?'

जे जाळपोळ करतात, देशविरोधी घोषणा देतात त्यांना जुलूस काढायला परवानगी दिली जाते.

Updated: Dec 27, 2019, 06:38 PM IST
'भारत हिंदुंचा एकमेव देश, त्यालाच जाळाल तर उद्या कुठे जाल?' title=

मुंबई: संकुचित राजकारणासाठी विरोधक नागरिकत्व सुधारणा कायद्याला (CAA)विरोध करत आहेत. त्यासाठी देशाला आग लावत आहेत. मात्र, भारत हा जगातील हिंदुंचा एकमेव देश आहे. त्यालाच जाळाल तर उद्या कुठे जाल, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना विचारला. ते शुक्रवारी भाजपतर्फे मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या संविधान रॅलीत बोलत होते. यावेळी फडणवीस नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्यांवर तुटून पडले. त्यांनी म्हटले की, जे जाळपोळ करतात, देशविरोधी घोषणा देतात त्यांना जुलूस काढायला परवानगी दिली जाते. मात्र, आम्हाला शांतपणे चौपाटीवर जाऊन लोकमान्य टिळकांना अभिवादन करायचे होते. मात्र, त्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. हे पाहून मला सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?, हा एकच प्रश्न विचारावासा वाटतो. तुम्ही आम्हाला मार्च काढण्यापासून रोखू शकता पण सीएए आणि NCR चे समर्थन करण्यापासून नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. 

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्यांनी एक ध्यानात घ्यायला पाहिजे की, हा देश राहिला तर तुम्ही राहाल. संकुचित राजकारणासाठी तुम्ही देशाला आग लावताय. मात्र, भारत हा जगाच्या पाठीवर असलेला एकमेव हिंदू देश आहे. त्यालाच आग लावली तर उद्या कुठे जाल, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच नागरिकत्व सुधारणा कायदा हा कोणाचे नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला. कालपर्यंत शिवसेनाही देशातील बांगलादेशींना बाहेर काढण्याची भाषा बोलत होते. मात्र, आता सत्ता आल्यामुळे त्यांच्या तोंडाला कुलूप लागले आहे. आपली खुर्ची वाचवण्यासाठी ते सावरकरांचा अपमानही सहन करतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.