मुंबई : कोर्टाचं काम आणि सहा महिने थांब किंवा तारीख पे तारीख या ओळी आपण कायमच ऐकत आलोत. लाखो प्रकरणे प्रलंबित असताना कोर्टाने उन्हाळी सुट्ट्यांवर जाणं यावरही अनेकांचा आक्षेप असतो. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनी या प्रतिमेला छेद देणारी कृती केलीय. या न्यायमूर्तींनी पहाटे साडेतीन वाजेपर्यंत काम करुन तब्बल १२१ प्रकरणं निकाली काढलीत. अत्यंत कष्टाळू आणि न्यायदानाच्या कामासाठी स्वतःला झोकून देणारे न्यायमूर्ती अशी ओळख असणाऱ्या शाहरुख काथावाला या न्यायमूर्तींनी साडेसतरा तास काम करत इतिहास घडवला. एरव्ही दिवे लागण्याच्या आत बंद होणारं मुंबई उच्च न्यायालय शनिवारी पहाटे सूर्यादयाच्या अवघे काही तास आधी बंद झालंय.
मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. शुक्रवारी संध्याकाळी 5 नंतर हायकोर्टाची उन्हाळी सुटी सुरु होणार होती. मात्र अंतरिम आदेशासाठी आलेली प्रकरणं पाहाता न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांनी कामकाज सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला. अखेरच्या दिवशी न्यायमूर्ती काथावाला यांनी कोर्ट रुम नंबर 20 मध्ये सकाळी दहा वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात केली. कामकाज सुरू केल्यानंतर दुपारी भोजनासाठी केवळ अर्ध्या तासाचा ब्रेक न्यायमूर्तींनी घेतला होता. त्यानंतर त्यांनी शनिवारी पहाटे ३.३० पर्यंत सलग काम केले. विशेष म्हणजे, त्यांचे सहाय्यक, शिरस्तेदार इत्यादी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनीही मोलाची साथ दिली आणि तेही पहाटे ४-५च्या सुमारास आपापल्या घरी गेले.
पाहा बातमीचा व्हिडिओ