नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक अस्वच्छ दहा रेल्वे स्थानकांच्या यादीत मुंबईतील तीन स्थानकांचा समावेश करण्यात आलाय. मुंबई शहर आणि उपनगरातील रेल्वे स्थानकांचा यात समावेश करण्यात आलाय. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाचा या रेल्वे स्थानकांत फज्जा उडालेला दिसून येत आहे. रेल्वे विभाग केंद्र सरकारच्याअंतर्गत आहे. त्यामुळे स्वच्छतेला रेल्वेकडून हरताळ फासण्यात आल्याचे दिसून येत आहे.कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठाणे ही भारतातील टॉप टेन अस्वच्छ रेल्वे स्टेशन्सपैकी एक आहेत.
भारतीय रेल्वेकडून देशातील काही रेल्वे स्थानकांची पाहाणी करण्यात आली. ही पाहाणी ११ ते १७ मे या कालावधीत करण्यात आली. यावेळी रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतेबाबत निरीक्षण नोंदविण्यात आले. अस्वच्छ स्थानकांमध्ये उत्तर प्रदेशातील कानपूर रेल्वे स्थानकाचा पहिला क्रमांक लागतो. तर मुंबईतील कल्याणचा तिसऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस पाचव्या, तर ठाणे आठव्या स्थानावर आहे.
मुंबईतील कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि ठाणे या मध्य रेल्वेवरील तिन्ही स्थानक सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक आहेत. कल्याण, डोंबिवली ही मोठी गर्दीची ठिकाणे आहेत. कल्याणमधून दरदिवशी जवळपास २ लाख २० हजार प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे सुमारे५९ टक्के प्रवाशांनी कल्याण स्थानकाच्या अस्वच्छतेबद्धल नाराजी व्यक्त केलेय.