मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह कविता सोशल मीडियावर पोस्ट केलेली अभिनेत्री केतकी चितळे चांगलीच चर्चेत आहे. याप्रकरणी कळवा पोलिसांनी तिला 14 मे रोजी अटक केली आहे. तेव्हापासून केतकी चितळे अजूनपर्यंत तुरूंगातच आहे. तिने मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र केतकी चितळेला अद्यापपर्यंत जामीन मिळू शकलेला नाही.
महिना उलटून गेला तरी केतकी चितळे अजूनही तुरूंगातच आहे. यामुळे केतकीने आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे. आपली अटक ही बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कायद्यांचा भंग करून आपल्याला कळवा पोलिसांनी अटक केल्याचे केतकी चितळेने आपल्या नवीन याचिकेत नमूद केले आहे.
नाशिकचा विद्यार्थी निखिल भामरे यानेदेखील शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली होती. यानंतर निखिल भामरे यालादेखील पोलिसांनी अटक केली आहे. त्यानेदेखील जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले होते.
रोज हजारो ट्विट केले जातात. मग प्रत्येक ट्विटची दखल घेणार का ? असे म्हणत हे शरद पवार यांनाही असे विद्यार्थ्याला डांबून ठेवणे आवडणार नाही. यामुळे शरद पवार यांच्या नावाला गालबोट लागेल असे न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले होते.
यानंतर आज अभिनेत्री केतकी चितळे हिने मुंबई उच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे. आता केतकी चितळे हिच्या याचिकेवर न्यायालय काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.