मुंबई : गणेशोत्सवाच्या तोंडावरच धर्मदाय आयुक्त कार्यालयाने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला दणका दिलाय. लालबागच्या मंडळाला मिळणा-या देणगीची मोजणी आता धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारीत केली जाणार आहे.
यंदापासून हा नवा नियम लागू करण्यात आलाय. त्यामुळे या मंडळाला मिळणा-या देणगींवर प्रशासनाची नजर असणार आहे.
यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यलयाकडून तीन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये आर एच कुंभार, एस थोरगव्हाणकर, गोपु नटराजन या तिघांचा समावेश आहे. दानपेट्यांमधील रक्कम आणि दागिन्यांच्या लिलावावेळी गैरकारभार होत असल्याच्या कारणाने हा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी सामाजिक कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर पाठपुरावा करत होते.
गणेशोत्सव काळातील दानपेट्या या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नेमणूक केलेल्या निरीक्षकांच्या देखरेखीखाली उघडून त्यातील रकमेची मोजदाद करावी आणि ती रक्कम टृस्टचे खात्यात ताबडतोब जमा करावी, असे आदेश मंडळाला देण्यात आले आहेत. तसेच गणेशोत्सव काळातील जमा खर्चाचा वेगळा तपशील १० दिवसांच्या आत मंडळाने धर्मादाय आयुक्त कार्यालयास सादर करावा, असेही सांगण्यात आले आहे.