लोकसभेसाठी महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला ठरला, भाजप सर्वाधिक जागा लढवणार

Maharashtra Politics : लोकसभेसाठी महायुतीचा राज्यातल्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभेची जिंकलेली जागा त्या त्या पक्षाला मिळणार आहे. सर्वाधिक जागा भाजप लढवणार असल्याची माहितीही सू्त्रांनी दिलीय.

राजीव कासले | Updated: Feb 20, 2024, 10:03 AM IST
लोकसभेसाठी महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला ठरला, भाजप सर्वाधिक जागा लढवणार title=

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी. लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी रणनिती आखालयला सुरुवात केली आहे. राज्यात शिवसेना (Shivsena), भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी अजित पवार गट (NCP Ajit Pawar Group) सत्तेत आहे. भाजप,  शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असे 3  गट एकत्र आल्याने जागावाटपात मोठी चढाओढ होणार हे निश्चित मानले जात होते.  शिवसेना-भाजप युतीत मागून आलेल्या अजित पवार गटाला किती मिळणार? याबद्दलही उलटसुलट चर्चा सुरु होती. या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. 

असं असणार महायुतीचं जागावाटप
लोकसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आलीय. महायुतीच्या नव्या फॉर्म्युल्याची चर्चा सुरू असून, 32-12-4 असा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जातंय. भाजप 32, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी 4 जागांवर प्राथमिक चर्चा सुरू आहे. या जागावाटपाबाबत अंतिम निर्णय दिल्लीतून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

भाजपाचं मुंबईवर लक्ष
मुंबईतील 6 पैकी 6 लोकसभा जागा जिंकण्याची भाजपची रणनीती आहे. यासाठी भाजपाने 'नो रिस्क' धोरण ठरवलंय. राज ठाकरेंच्या मनसेला महायुतीत घेतल्यास मुंबई जिंकता येईल, असा भाजप नेतृत्वाचा कयास आहे.
त्यादृष्टीनंच मनसेला महायुतीत सामावून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं समजतंय. याचाच एक भाग म्हणजे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार सोमवारी सकाळीच राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी या दोन नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊनच शेलार राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मनसे महायुतीबरोबर आल्यास त्यांना किती जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलंन नाही.

 महायुतीच्या जागावाटपाची प्राथमिक चर्चा महाराष्ट्रात होणार आहे. त्यानंतर दिल्लीत जागावाटपाला हिरवा कंदील मिळणार असल्याचं समजतंय.

संजय निरुपम भाजपच्या वाटेवर
दरम्यान, काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. निरुपम अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यात ते आता भाजपत प्रवेश करणार असल्याचं सुत्रांकडून समजतंय. मुंबईत भाजपकडून काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का देण्याचा हा प्रयत्न मानला जातोय..