Dilip Walse Patil EXclusive : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मोठी माहिती दिली आहे. चांदीवाल आयोगाच्या अहवालात अनिल देशमुख यांना क्लिनचिट देण्यात आल्याची माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. झी 24 तासला दिलेल्या Exclusive मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला असून लवकरच त्यावर योग्य कारवाई केली जाईल, असं गृहमंत्र्यानी स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाच्या अहवालात 100 कोटी खंडणीच्या आरोपाची आयोगाकडून चौकशी करण्यात आली त्यासंदर्भातला हा अहवाल आहे. यात अनिल देशमुख यांना क्लिनचिट देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
अहवालात अनिल देशमुख यांना क्लिनिट
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. या आरोपांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने चांदीवाल आयोग नेमला होता.
चांदीवाल आयोगाने चौकशी करून आपला अहवाल तयार केला. हा अहवाल आयोगाने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे दिला. त्यांनतर गृहमंत्री वळसे पाटील यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हा अहवाल त्यांच्याकडे सुपूर्द केला.
चांदीवाल आयोगाने मागील महिन्यात चौकशी पूर्ण केली. आयोगाने केलेल्या चौकशीच्या आधारे सुमारे 200 पानांचा अहवाल तयार करण्यात आला आहे. आयोगाने आपल्या अहवालात देशमुख यांना क्लिनचिट दिल्याची माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी केलेले आरोप हे कळते - समजतेच्या आधारावर आहेत. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.