शिवसेनेला एवढ्या जागा मिळतील; रावते-जोशींना विश्वास

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे.

Updated: Oct 21, 2019, 12:26 PM IST
शिवसेनेला एवढ्या जागा मिळतील; रावते-जोशींना विश्वास title=

मुंबई : महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्ष राज्यावर आपलीच सत्ता येईल असा विश्वास व्यक्त करत आहे. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येईल, तसंच शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल या मतावर शिवसेनेचे नेते ठाम आहेत.

राज्यामध्ये भाजपला १२० ते १३० जागा मिळतील तर शिवसेनेला ८५-९० जागा मिळतील, असा अंदाज शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी वर्तवला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा हा उद्धव ठाकरेंचा निर्धार आहे, पण तो कोण होईल हे माहिती नाही, असं दिवाकर रावते म्हणाले.

दुसरीकडे शिवसेनेला १०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी वर्तवला आहे. आदित्य ठाकरे निवडणूक लढवतायत ही आनंदाची गोष्ट आहे. ते रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील, अशं मनोहर जोशी म्हणाले. शिवसेनेचा मुख्यमंत्री हे मी ऐकतोय, आता ते पूर्ण करणं कार्यकर्त्यांचं काम आहे, अशी प्रतिक्रिया मनोहर जोशींनी दिली.

शरद पवार हे माझे मित्र आहेत, पण माझा पक्ष त्यांच्या विरोधात आहे, त्यामुळे मीही त्यांच्याविरुद्ध आहे, असं वक्तव्य मनोहर जोशी यांनी केलं आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना आणि मित्रपक्ष यांच्यात महायुती तर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये आघाडी झाली आहे. शिवसेना २८८ पैकी १२४ जागांवर निवडणूक लढवत आहे. 

विधानसभा निवडणूक २०१९ प्रत्येक बातमीसाठी क्लिक करा