Maharashtra Vidhan Sabha: विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये (Maharashtra Vidhan Sabha Budget Session 2023) आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा भारतीय जनता पार्टीचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी एकेरी उल्लेख केल्याने मोठा गदारोळ झाला. या नंतर काही वेळासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. पुन्हा कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कठोर शब्दांमध्ये निषेध नोंदवताना सातपुतेंनी माफी मागावी अशी मागणी केली. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार छगन भुजबळ यांनीही आक्षेप घेतला. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी भाजपाच्या वतीने माफी मागितली. त्यानंतर राम सातपुतेंनीही पहिल्या टर्मचा आमदार असल्याचं सांगत चुकून काही बोललो असेल तर दिलगीरी व्यक्त करतो असं म्हणत प्रकरणावर पडदा टाकला.
राम सातपुतेंनी राष्ट्रवादीवचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या भाषणानंतर सभागृहात आपलं मत मांडलं. "आव्हाड ज्या पद्धतीने हिणवत आहेत की मी दलित आमदार आहे ते चुकीचं आहे. होय मी दलित आहे. मी हिंदू दलित आहे. माझ्या बापाने चपला शिवल्या याचा मला अभिमान आहे. अजूनही सांगतो मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं म्हणून मी आमदार आहे. यांच्या पक्षाच्या शरद पवारने आरक्षण नाही दिलेलं," असं सातपुतेंनी म्हणताच सभागृहात विरोधी पक्षाच्या आमदारांनी विरोधी घोषणाबाजी सुरु केली. विरोधकांची घोषणाबाजी सुरु असतानाच, "मला अभिमान आहे. होय मी हिंदू दलित आहे. मी सनातन हिंदू धर्मात जन्म घेतला याचा अभिमान आहे. मला शिकवायची गरज नाही. लाज वाटली पाहिजे एका दलित आमदाराचा अशापद्धतीने अपमान करता," असं सातपुते म्हणाले. विरोधकांचा गोंधळ वाढल्यानंतर तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी, "मी चुकीच्या गोष्टी रेकॉर्डवरुन काढायला सांगतो," म्हणत विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
मात्र विरोधकांचा गदारोळ सुरुच होता. दरम्यान जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडताना, "प्रश्न रेकॉर्डवरुन काढून टाकण्याचा नाही. आमचे नेते शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करण्याचा आहे. सदस्य सातपुते यांनी एकेरी उल्लेख केल्याने त्यांनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी सभागृहात आमच्या सर्वोच्च नेत्याचा अपमान केल्याने माफी मागितली पाहिजे ही आमच्या सर्वांची मागणी आहे," असं पाटील म्हणाले.
पाटील यांच्यानंतर छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडताना, "जितेंद्र आव्हाड म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली म्हणून तुम्ही इथं आहात. आम्ही सुद्धा त्यांच्यामुळे आलो. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्यामुळे आपण इथे आला हे खरं आहे. हे सभागृह असेल ही घटना असेल ते त्यामुळेच आहे हे खरं आहे. त्यावर ते म्हणाले हो हो बाबासाहेबांमुळे आलो तुमच्या शरद पवारामुळे नाही आलो. ते असं म्हणाल्याने गोंधळ झाला. बाबासाहेबांचं नाव घेतलं, महाराजांचं नाव घेतलं त्यात प्रश्न येतो कुठे?" असा प्रश्न उपस्थित केला.
यानंतरही गदारोळ सुरु असल्याने 5 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं आगमन झाल्यानंतर पुन्हा कामकाज सुरु झालं तेव्हा सातपुतेंनी माफी मागावी यावरुन पुन्हा गोंधळ सुरु झाला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, "मी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशीही बोललो. शेवटी प्रत्येकाला आपल्या आपल्या वरिष्ठ नेत्यांचा अभिमान असतो आणि तो असला पाहिजे. मी पण बरेच वर्ष या सभागृहात बघितलं कोणी कुठल्याही वरिष्ठ नेत्याबद्दल यदाकदाचित काही चुकीचा शब्द वापरला तर मी तपासून घेतो आणि पाहतो याला वेळ लागतो," असं म्हटलं. तसेच पुढे बोलताना अजित पवार यांनी, "एकेरी उल्लेख झाला असं या सर्वांचं म्हणणं आहे. मी ऐकायला नव्हतो. एकेरी उल्लेख झाला असेल तर मुद्दा नुसता तो काढून टाकायचा नाही. हे नवे पायंडे पडतील. उद्या मग सत्ताधारी लोकांच्या भावना भडकतील अशाप्रकारची वक्तव्य केली जातील. त्यांचेही वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल कोणी दुसऱ्यांनी बोललं तर शब्दाने शब्द वाढत जाईल. जे तपासायचं ते संध्याकाळी तपासा. सन्माननिय सातपुतेंनी एकेरी उल्लेख केला त्याबद्दल माफी मागा आणि विषय संपवा," अशी मागणी केली.
अजित पवारांच्या या मागणीनंतर नार्वेकरांनी, "कोणत्याही पक्षाचे नेते असले तर त्यांचा आदर ठेवला पाहिजे याबद्दल दुमत नाही. कोणीही एकेरीत बोललं असेल तर या सभागृहात ते सहन केलं जाणार नाही. मला रेकॉर्ड तर तपासू द्या. जर एकेरी उल्लेख असेल तर आपण ते काढून टाकू," असं म्हटलं. मात्र आधी सातपुतेंनी माफी मागावी यावर राष्ट्रवादीचे आमदार ठाम होते.
अजित पवारांनी, "असे पायंडे पडणार असतील तर आधीच लक्षात आणून देतो. वेगवेगळ्या वरिष्ठांबद्दल अशाप्रकारची वाक्यरचना केली जाईल. माफी मागितली जाणार नाही. आम्ही म्हणून काढायचं असेल तर काढा माफी मागणार नाही. असे पायंडे पाडू नका. माझी हात जोडून विनंती आहे. त्यांना एवढं वाईट वाटण्याचं काही कारण नाही. शेवटी वरिष्ठ नेत्यांचा आदर केला पाहिजे. आम्ही आदर करतो तसा त्यांनी आमच्या नेत्यांचा आदर केला पाहिजे. त्यांचं काम, त्यांच्याबद्दल पंतप्रधानांनी केलेली वक्तव्य असं असतानाही तुम्ही रेकॉर्ड तपासून पाहून असं म्हणताय. सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत. माफी मागावी एवढं म्हणणं आहे," असं म्हणत आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली.
यानंतर भाजपाच्यावतीने अशिष शेलार यांनी भूमिका स्पष्ट केली. "खऱ्या अर्थाने घटनाक्रम सांगायचा झाल्यास. जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना सनातन धर्म, हिंदू धर्माबद्दल नकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात अशी चिन्ह होती. सन्माननिय सत्ताधाऱ्यांचं असं मत झालं ते योग्य की अयोग्य ते अध्यक्ष तपासतील. माननिय शरद पवार साहेब यांचा अमपान, उपमर्द, एकेरी उल्लेख, मुद्दामून घालून पाडून उल्लेख आम्हाला मान्य नाही. या सदनात कुठल्याच नेत्याचा अपमान होईल असं बोलतं कामा नये. पण मी भाजपाच्या वतीने असं वाक्य आलं असेल तर मी माफी मागतो. मी राम सातपुतेंना विनंती करतोय. मात्र अजित दादांनी हे ही लक्षात घ्यावं की आव्हाड बोलताना त्यांच्याकडून एखाद्या विशिष्ट धर्माचा म्हणजे हिंदू धर्माच्या भावनांबद्दल अनादर होतो हे ही लक्षात घेतलं पाहिजे," असं शेलार म्हणाले.
या सर्व चर्चेनंतर सातपुतेंनी माफी मागितली. "या सभागृहात सन्मानिय सदस्य आव्हाड भाषणाला उभे राहिले. त्यांनी त्यांच्या भाषणातून सनातन धर्म किंवा वेगळ्या विषयावर अथिषय चुकीच्या पद्धतीने टीप्पणी केली. त्याला मी आक्षेप घेतला. मला अध्यक्षांनी मला संधी दिली नाही तर शांत बसलो. त्यानंतर तालिका अध्यक्ष योगेशजी सागर आले त्यांनी मला बोलायची संधी दिली. त्यावेळीस त्यांनी तुच्छतेने माझ्याकडे हातवारे करुन राम सातपुते तुम्ही मागासवर्गीय मतदारसंघातून निवडून आला आहात. तुम्हाला बाबासाहेबांनी आरक्षण दिलं म्हणून. मला अभिमान आहे मी दलित, मगासवर्गीय आहे याचा. मला बाबासाहेबांनी आरक्षण दिलं नसतं तर इथं चाकरी करावी लागली असती असं म्हटलं," असं सांगत सातपुतेंनी नाराजी व्यक्त केली.
शेवटी, "मी पहिल्या टर्मचा आमदार आहे. माझ्याकडून बोलण्याच्या ओघातून माझ्याकडून काही झालं असेल तर या सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो. पण मी पुन्हा म्हणतो की मला बाबासाहेबांनी आरक्षण दिलं आहे कुठल्या पक्षाच्या नेत्याने दिलेलं नाही," असं म्हणत सातपुतेंनी माफी मागितली.