Mahim Results 2024 Live Updates : महेश सावंत विजयी; माहिममध्ये दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा, 'राज'पुत्र पराभूत

Maharashtra Mahim Vidhan Sabha Nivadnuk Result 2024: 'मी त्यांच्यापुढे पैशाला तोकडा पडलो पण...' बाळासाहेबांचं नाव घेत 'राज'पुत्राचा पराभव करणाऱ्या महेश सावंतांची पहिली प्रतिक्रिया  

सायली पाटील | Updated: Nov 23, 2024, 03:13 PM IST
Mahim Results 2024 Live Updates : महेश सावंत विजयी; माहिममध्ये दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा, 'राज'पुत्र पराभूत title=
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates mahim Constituency Nivadnuk Nikal amit thackeray sada sarvankar mahesh sawant mns shinde ubt shivsena

Maharashtra Mahim Vidhan Sabha Nivadnuk Result 2024: शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या माहिम मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळाली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शिंदेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा पक्षांकडून माहिम मतदारसंघातून उमेदवार उभे करण्यात आले होते. सुरुवातीपासूनच या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचं वर्चस्व असेल असं चित्र आणि एकंदर वातावरण होतं. 

सरवणकरांना 'राज'पुत्र अमित ठाकरे या युवा नेतृत्त्वानं आव्हान दिलेलं असतानाच या दोघांनाही टक्कर होती ती म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उभ्या असणाऱ्या महेश सावंत यांचं. अखेर मनसे, शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुमसणाऱ्या या ठिणगीचा दाह याच दोन्ही पक्षांना सोसावा लागला आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेचा उमेदवार अर्थात महेश सावंत यांनी या मतदारसंघात विजय मिळवला.

विजयाची हमी सुरुवातीपासूनच... 

माहिम हा सुरुवातीपासूनच (अविभाजित) शिवसेनेचा बालेकिल्ला ठरलेला मतदारसंघ. या मतदारसंघात अमित ठाकरे यांना उमेदवारी मिळणं अनेकांच्या आकलनापलीकडलं असूनही मतदारांनी त्यांच्या पारड्यातही मतं दिली. पण, खरी बाजी मारली ती महेश सावंत यांनीच. किंबहुना आपल्याला या निकालाची हमी असल्यामुळंच आपण निर्धास्त असल्याचं ते निकालापूर्वीच म्हणाले होते. 

सरवणकर यांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला गोंधळ, त्यांनी तिकीट मागे घ्यावं यासाठी करण्यात आलेले प्रयत्न. त्यातच मनसेशी झालेले मतभेद या दोन पक्षांच्या वादाचा थेट फायदा महेश सावंत यांना झाल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत. 

विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देत सावंत म्हणाले... 

माहिम मतदारसंघात दमदार कामगिरी करत आमदारकीची ही निवडणूक दणक्यात जिंकून आलेल्या महेश सावंत यांनी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. 'आज आमच्यासमोर दोन तगडे उमेदवार होते. एक धनवान होता, की ज्यांची संपत्ती त्यांनाच ठाऊक नसावी आणि एक राजपुत्र होता ज्यांना आम्हाला टक्कर द्यायची होती. पण, आज सामान्य जनतेचा विजय झाला आहे. मी पुढची पाच वर्ष इतका काम करणार आहे, की आमदार कसा असावा हे जनतेच्या लक्षात येईल', असं सावंत म्हणाले.

आपली लढत अटीतटीची होईल याची अपेक्षा होतीच असं सांगताना त्यांनी या मतदारसंघात सढळ हस्ते करण्यात आलेली उधळपट्टी आणि तत्सम प्रकारांवरही कटाक्ष टाकला. 'मी त्यांच्यापुढे पैशाला तोकडा पडलो, त्यांच्याकडे सगळीच ताकद जास्त होती पण मी मोठ्या जिद्दीनं आणि निष्ठेनं बाळासाहेबांचा सैनिक म्हणून लढलो', असं म्हणत या विभागावर बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.  

हेसुद्धा वाचा : Worli Result 2024 Live Updates : वरळीतून आदित्य ठाकरे किती मतांनी विजयी?

 

 

पाहा या मतदारसंघातील लाईव्ह अपडेट्स ... 

माहीममध्ये दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा. अमित ठाकरे पराभूत. महेश सावंत यांचा या मतदारसंघातून विजय.

12.40 माहिममध्ये अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार 

माहिम मतदारसंघात महेश सावंत यांच्याकडे 22249 आघाडी. सदा सरवणकर 8136 मतांनी पिछाडीवर. 7 व्या फेरीअखेर मतांची संख्या... 

महेश सावंत 22249 
सदा सरवणकर 14113
अमित ठाकरे 9965

10.57 : माहिम मतदारसंघात उलटफेर होणार का? सरवणकर आणि अमित ठाकरे यांना शह देत महेश सावंत बाजी मारणार का? आघाडी सावंतांकडे असल्यामुळं चर्चांना उधाण 

10.20 : माहिम मतदारसंघातील दुसऱ्या फेरीनंतरची आकडेवारी 

महेश सावंत 1657 मतांनी आघाडीवर 

महेश सावंत 5692
सदा सरवणकर 4035 
अमित ठाकरे 3449 

अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवार 

09.44 : दुसऱ्या फेरीनंतरही महेश सावंतच आघाडीवर 

अमित ठाकरे 3443
महेश सावंत 5692
सदा सरवणकर 4030

08.30 : विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी महेश सावंत यांनीसुद्धा सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी माहिम मतदारसंघात असणारं सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंचं आव्हान असताना आपल्याला विजयाची खात्री असल्यामुळं मी निर्धास्त आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. हार-जीत ही जीवनातील एक पायरी असते, त्यामुळं आपण आपली दैनंदिन कार्य सुरू ठेवावीत असं सावंत म्हणाले. 

07.15 : माहिम मतदार संघाच्या निकालाकडे अनेकांचं लक्ष.