Maharashtra Worli Vidhan Sabha Nivadnuk Result 2024: यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं, तर महाविकासआघाडीचा अनेक मतदारसंघांमध्ये दारुण पराभव झाला. वरळीचा गड मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं राखण्यात यश मिळवलं. जिथं राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्या नावे विजयाची मोहोर उमटवण्यात आली. (Aditya Thackeray Win )
शिंदेंच्या शिवसेनेचे मिलिंद देवरा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांचा आदित्य ठाकरे यांनी पराभव केला. उपलब्ध माहितीनुसार आदित्य ठाकरे 8 हजार मतांनी त्यांच्या या हक्काच्या मतदारसंघात विजयी झाले.
वरळी मतदारसंघ इतका महत्त्वाचा का?
मुंबईतील वरळी मतदारसंघानं कायमच शहराच्या आणि राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शहराशी प्रमुख भागांना जोडणाऱ्या या भागामुळं या मतदारसंघाचं महत्त्वं वाढलं. सुरुवातीला या मतदारसंघावर काँग्रेसचा दबदबा होता. 2014 च्या निवडणुकीत मात्र इथं शिवसेनेनं पुन्हा आपली जागा मिळवली. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिला. युवा नेते आदित्य ठाकरे यांनी या मतदारसंघात गतकाळातील निवडणुकीत 89248 मतांनी घवघवीत यश मिळवलं. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्यापुढं मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडे यांचं आव्हान असल्यामुळं या तिरंगी लढतीकडे सर्वांचंच लक्ष राहिलं होतं.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आणि या मतमोजणीमध्ये टपाली मतं अर्थात पोस्टल मतांच्या आधारावर पहिले कलही हाती आले. मुंबईतही हेच चित्र पाहायला मिळालं, जिथं वरळी मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या नावे आघाडी असल्याचं दिसून आलं. मतमोजणीच्या दरम्यानच्या काळात मात्र ठाकरेंची ही आघाडी कमीसुद्धा झाली. पण, अखेर आदित्य ठाकरे यांनी हा विजय खेचून आणला.
2010 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत (अविभाजित) शिवसेनेच्या युवासेनेची स्थापना झाली आणि याची धुरा बाळासाहेबांनी 19 वर्षीय तरुण नेतृत्त्वाच्या खांद्यांवर सोपवली होती. ते नाव होतं आदित्य उद्धव ठाकरे. बाळासाहेबांनी असंख्य शिवसैनिकांच्या उपस्थितीत आपला राजकीय वारसदार जाहीर केला होता. ज्यामुळं येत्या काळात हा चेहरा सातत्यानं समोर येणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंच्या या लेकाचीही चर्चा पाहायला मिळणार हाच पहिला विचार अनेकांच्या मनात आला आणि अगदी तसंच झालं.
युवासेनेची स्थापना झाल्या क्षणापासून आदित्य ठाकरे यांनी सक्रिय राजकारणात सहभाग घेत शिवसेनेचा नव्या विचारांचीसुद्धा जोड दिली. अतिशय कमी वेळामध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख उंचावताना दिसला. सुरुवातीला मुंबईतील राजकारणात सक्रिय असणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी पाहता पाहता राज्याच्या राजकारणातही महत्त्वाची भूमिका निभावण्यास सुरुवात केली.
2019 हे वर्ष आदित्य ठाकरे यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारं ठरलं. ठाकरेंची परंपरा मोडित काढत त्यांनी निवडणूक लढली आणि वरळी विधानसभा मतदारसंघातून ते ही निवडणूक जिंकलेसुद्धा. त्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी वरळीत एकही उमेदवार दिला नाही. 89 हजार मतं मिळवत आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादीचा धुव्वा उडवला. मविआ सरकारमध्ये त्यांना पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार अशी मंत्रीपदं त्यांना देण्यात आली. जिथं ते सर्वात तरुण मंत्रीसुद्धा ठरले. अवघी दोन वर्षे त्यांचं हे मंत्रीपद टीकू शकलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं शिवसेनेला खिंडार पडलं आणि तिथंच मविआचं सरकार कोलमडलं.
पक्ष आणि चिन्हं गेलं तरीही आदित्य ठाकरे यांनी सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत किमया केली. ज्याप्रमाणं 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरेंच्या भूमिकेनं मविआला मोलाची मदत केली त्याचप्रमाणं आता विधानसभेतही अशीच काहीशी हवा पाहायला मिळाली. सामान्यांशी त्यांचं सहजतेनं वागणं मतदारांच्या मनात आणि मताचा ठाव घेऊन गेलं.
वरळीत आदित्य ठाकरे 12 व्या फेरीअखेर 6120 मतांनी आघाडीवर
9 व्या फेरी अखेर आदित्य ठाकरे 1682 मतांनी आघाडी
आदित्य ठाकरे आठव्या फेरीअखेर 2200 मतांनी आघाडीवर
सातव्या फेरीअखेर आदित्य ठाकरे 1067 मतांनी आघाडीवर
वरळी विधानसभा; आदित्य ठाकरे दुसऱ्या फेरी अखेर 696 मतांनी आघाडीवर. आदित्य ठाकरे - 8236, मिलिंद देवरा - 7540, संदीप देशपांडे - 4787 मतं
वरळी पहिली फेरी
आदित्य ठाकरे - 4169
मिलिंद देवरा - 3861
संदीप देशपांडे - 2391
वरळीत मतमोजणी संथगतीने अद्याप पोस्टल मतमोजणी सुरुच.