Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच या निवडणुकीआधी राजकीय वर्तुळात कैक घडामोडींना उधाण आलं आहे. त्यातच शिवसेना या पक्षाच्या नावावरून सुरू असणारा वाद अद्यापरही शमलेला दिसत नाही. निवडणूक आयोगानं हे नाव आणि पक्षाचं चिन्हं शिंदेंच्या पारड्यात टाकलं असलं तरीही उद्धव ठाकरे यांनी मात्र हा पक्ष आणि हे नाव आपलंच असून ते कोणालाही देण्याचा अधिकार निवडणूक आयोगालासुद्धा नाही, अशा शब्दांत आपली ठाम भूमिका मांडली.
'झी 24तास'च्या 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत त्यांनी काही मुद्द्यांवर आपली परखड मतं मांडली. उद्धव बाळाबाहेब ठाकरे पक्षाचे... अशी सुरुवात करून देतानाच 'शिवसेनेचेच..., कारण शिवसेना हे नाव दुसरं कोणाला देण्याचा अधिकार कोणालाच नाही. निवडणूक आयोगालाही नाही. कारण शिवसेना हे नाव माझे वडील आणि माझ्या आजोबांनी दिलं आहे. ते इतर कोणाला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. त्यामुळे माझी शिवसेना हीच शिवसेना आहे', असं उद्धव ठाकरे म्हणाले.
निवडणुकीच्या प्रचारामध्ये सध्या चर्चेत असणाऱ्या 'बटेंगे तो कटेंगे' या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी आपलं मत मांडत माझ्यासाठी प्रचार भाजपचं 'महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तोमे बाटेंगे' इथपासूनच सुरू झाला. 'त्यांनी गद्दारी करत माझं सरकार पाडलं आणि महाराष्ट्राला लुटण्याचा कार्यक्रम सुरू केला, दोस्तांना वाटण्याचा आणि तो गुजरातला नेण्याचा कार्यक्रम सुरू केला. म्हणून लुटेंगे और बाटेंगे हा त्यांचा कार्यक्रम जिथं सुरू झाला तिथं माझा प्रचारही सुरू झाला', असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रातील ध्रुवीकरणाच्या राजकारणासंदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले, 'मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो, किती लोकं कापली गेली? एकसुद्धा नाही. उलट दिल्ली पेटली होती. सीएए एनआरसीच्या वेळी महाराष्ट्रात मात्र एकही दगड उचलला गेला नाही. ज्या राज्यांमध्ये केंद्राची सत्ता आहे तिथं हे सर्व चालतं, माझ्या राज्यात नाही चालत. त्यांच्याकडे मुद्दे नाहीत आणि म्हणून लुटेंगे और बाटेंगे हाच त्यांचा कार्यक्रम आहे', अशा स्पष्ट शब्दांच त्यांनी भाजपचा समाचार घेतला.