मुंबई : मराठा आरक्षणाबाबत अंतिम निकाल अजून हाती यायचा आहे. निकाल वाचल्यानंतर महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय घेईल, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. देशातील अनेक राज्यात आरक्षण ५० टक्क्यांच्या पुढे आहे. त्यामुळे २०२०-२१ च्या आरक्षणाबाबत हा निकाल का यावा याबाबत प्रश्नचिन्ह आहे. हा खटला घटनापीठाकडे गेला आहे. तिथे यालाही आव्हान देण्यात येईल. मात्र जे काही विषय असतात ते घटनापीठाकडेच जावेत असा प्रघात आहे. मात्र २०२०-२१ बाबत दिलेला निकाल हा प्रघातच्या पलिकडे आहे, असे काँग्रेसचे नेते सावंत यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने मोठा हादरा दिला आहे. हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करतानाच आरक्षण प्रक्रियेलाही स्थगिती देण्यात आली आहे. अॅडमिशन प्रोसेस आणि नोकऱ्यांबाबत या आरक्षणाचा उपयोग देण्यात येऊ नये असं न्यायालयाने म्हटलंय. राज्यातल्या मेडिकल अॅडमिशन प्रोसेस आणि नोकरी भरतीत मराठा आरक्षणाचा उपयोग करण्यात येऊ नये, असे न्यायालयाने म्हटले आहे.
प्रकरण पाच न्यायमूर्तींकडे देण्यात आले असले तरी आरक्षणाला नोकर भरती आणि अॅडमिशन्सबाबत मोठा धक्का न्यायालयाच्या निर्णयामुळे बसलाय. न्यायालयाने तूर्तास केवळ मेडिकल अॅडमिशन्सचा उल्लेख केला आहे.