दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतने मुंबईची तुलना पाकिस्तानसोबत केल्यानंतर, तसंच मुंबई पोलिसांवरील तिच्या वक्तव्यानंतर, अनेक माध्यमातून कंगनावर टीका होत आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथमच वक्तव्य केलं आहे. अशा वक्तव्य करणाऱ्यांना आपण अधिक महत्त्व देतोय, अशी वक्तव्य लोक गांभीर्याने घेत नाहीत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
मुंबई, महाराष्ट्रातील लोकांना पोलीसांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे, त्यांचे कर्तृत्व त्यांना माहित आहे. त्यामुळे कुणी पाकिस्तानशी तुलना केली किंवा आणखी कुणाशी केली तरी त्याकडे आपण गांभीर्याने लक्ष देऊ नये. याला अधिक प्रसिद्ध देऊन या गोष्टी मोठ्या केल्या आहेत. शहाण्या लोकांनी या गोष्टींबद्दल फार बोलू नये, असं शरद पवार म्हणाले.
कंगणाच्या कार्यालयातील बांधकाम कारवाईबाबत फारशी माहिती नसल्याचं शरद पवार म्हणाले. परंतु, मुंबईत बेकायदेशीर बांधकामं नवी गोष्ट नाही, असं ते म्हणाले. पण सध्याची पार्श्वभूमी लक्षात घेता कारवाई केली तर लोकांच्या मनात शंकेला आपण संधी देतो. पण, महापालिकेची काही नियमावली आहे, अधिकार्यांना योग्य वाटलं असेल त्यामुळे त्यांनी काही केलं असेल, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, कंगनाविरोधात शिवसेना आक्रमक झाली असताना, मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली आहे. कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम दाखवत पालिकेने त्यावर हातोडा चालवला. शिवसेना आणि कंगना यांच्यातील वाद आता आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत.