मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेनेचे फायर ब्रँडनेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांचं लक्ष हे शिवसेना वाढवण्यावर नाही, तर उद्धव ठाकरे ज्या खुर्चीत बसले आहे, त्या खुर्चीवर आहे. राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली आहे, असे गंभीर आरोप नारायण राणे यांनी केले आहेत. राणे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळेस त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. (micro small and medium enterprises minister narayan rane critisized to shivsena mp sanjay raut)
राणे काय म्हणाले?
"संजय राऊतांचं लक्ष हे शिवसेना वाढवण्याकडे नाहीए, तर उद्धव ठाकरे जिथे बसले आहेत ना त्या खुर्चीवर आहे. हा शिवसेनेचा नाही, तर पूर्ण राष्ट्रवादीचा आहे. त्याला सुपारी मिळाली आहे, यांना हटव तुलाच करतो", अशा शब्दात राणेंनी राऊतांवर जोरदार प्रहार केला.
राऊतांच्या पत्रकारितेवर निशाणा
"तू पत्रकार नाहीस आणि संपादकही नाहीस तुझी भाषा त्या पात्रतेची नाही. तू बेताल आरोप करतोस, पण काल अस्वस्थ का झाला. का बेजाबदार बोलत होता, घामाघूम झाला, थैयथैयाट करत होता, कशामुळे, प्रविण राऊतने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर थैयथैयाट झाला", अशा शब्दात राणेंनी राऊत यांच्या पत्रकारितेची लक्तरं काढली.
"काय असं आहे तू एवढा घाबरलास, का थैयथायट करतोयस मग भाजपवर आरोप करतोस, या नेत्याचं असं आहे, त्या नेत्याचं असं आहे. पुरावे एक तरी देना पत्रकार आहेस ना" असं आव्हान राणेंनी राऊतांना दिला.
"स्वत:वर आधी उत्तर दे"
राणेंनी राऊत यांच्या अलिबागमधील संपत्तीबाबतही प्रतिक्रिया दिली. "आम्ही सांगतो, तुझी अलिबागची ५० एकर जमीन ५० लाखात घेतली. रस्ताही तुझ्या खात्यातील फंडातून केलास, हे पैसे आणले कुठून? सुजीत पाटकर कोण? तुझा कोण लागतो? त्याच्या नावावर एवढे व्यवहार कसे काय करु शकतात? त्याच्या कंपनीत तुझ्या मुली कशा काय डायरेक्टर असू शकतात?, असं तु दुसऱ्यांचं काढतो, स्वत:वर आधी उत्तर दे, त्यावर बोल, असा जाब राणेंनी विचारला.