मीरा-भाईंदर : मीरा भाईंदरच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर निवडणुक लढवत आहेत. २० ऑगस्टला २४ प्रभागातून ९५ जागांसाठी ही निवडणूक होतं आहे. निवडणूक लढवण्यासाठी गुन्हेगारी वृत्ती आणि श्रीमंत असण्याचीही गरज असते का? असा प्रश्न उमेदवारांच्या बायोडेटावर नजर टाकली की उपस्थित होतो. तसंच राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या शिक्षणाचा मुद्दाही दुर्लक्षित केला जातो.
या शहराची लोकसंख्या १५ लाखांच्या घरात आहे. मात्र मतदार फक्त ६ लाख आहेत. या निवडणुकीत जवळपास ५०६ उमेदवार रिंगणात आहेत. यात २७९ महिला उमेदवार असून २२७ पुरूष उमेदवार आहेत. एकूण ५०६ पैकी ८१ म्हणजे 16 टक्के उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यातील 56 उमेदवारांविरोधात चोरी, खंडणी, अपहरण, महिलांवर अत्याचार अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेले उमेदवार प्रत्येक पक्षातून उभे आहेत. भाजपाच्या ९३ पैकी २५ उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. त्यातील १८ जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिवेसेनेच्या ९२ पैकी १८ उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत, त्यातील १३ जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. काँग्रेसच्या ७४ पैकी १० उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत, त्यातील 5 जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रवादीच्या ७ जणांवर, मनसे आणि बहुजन विकास आघाडीच्या प्रत्येकी २ उमेदवारांवार गंभीर गुन्हे दाखल आहेत.
भाजचे ९३ पैकी ६३ उमेदवार कोट्यधीश आहेत. शिवसेनेचे ५८, काँग्रेसचे ४०, मनसेचे ५, बहुजन विकास आघाडीचे ५ उमेदवावर कोट्यधीश आहेत. तर आरपीय आणि समाजवादीचा प्रत्येकी एक उमेदवार कोट्यधीश आहे. अपक्षांना पैकी ११९पैकी २५ कोट्यधीश उमेदवार आहेत. म्हणजेच एकूण ५०६ उमेदवारांपैकी तब्बल २०९ उमेदवार कोट्यधीश आहेत.
उमेद्वारांच्या वयाची पाहणी केली असता एकूण ६० वर्षापुढील 20 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तर धक्कादायक बाब म्हणजे २२ उमेदवार हे अशिक्षित आहेत. ३९ उमेदवार पाचवी पास, १०३ उमेदवार ८वी पास, ११७ उमेदवार १०वी पास, ८० उमेदवार १२वी पास आणि २९ उमेदवार पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. यामुळे या निवडणुकीत उमेदवाराची शैक्षणिक पात्रता न पाहता केवळ श्रीमंती पाहूनच उमेदवारी दिल्याचं दिसून येतंय.