Maharashtra Politics : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्यांचा विषय छेडल्यानंतर सरकारनं आता प्रत्येक लाऊडस्पिकरला (Loud Speaker) परवानगी बंधनकारक केली आहे. त्यामुळे मंदिरं, मशिदींसह सर्व धार्मिक स्थळांची परवानगीसाठी धावाधाव सुरू झाल्याचं चित्र दिसतंय.
राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत अल्टिमेटम दिल्यानंतर सर्वांना पळता भुई थोडी झालीये. राज्यभरातल्या मशिदीच नव्हे, तर मंदिरांनाही लाऊडस्पिकरसाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे. राज्यातल्या प्रमुख शहरांमधल्या पोलीस ठाण्यांमध्ये अर्जांचा खच पडलाय.
भोंग्यासाठी परवानगी
मुंबईतील 944 मशिदींनी आतापर्यंत भोंग्यांसाठी रितसर परवानगी मिळवलीये. पुण्यात 226, वसई-विरारमध्ये 209, नाशिकमध्ये 60, औरंगाबादमध्ये 40 अर्ज आलेत.
शिवाय आता मंदिरांनाही भोंगे लावायचे तर परवानगी घ्यावी लागणार आहे आणि दर महिन्याला या परवानगीचं नुतनीकरण करावं लागणार आहे.
राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांची मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी बैठक घेतली. त्यानंतर मुंबईच्या काही मोठ्या मशिदींनी पहाटेची अजानच बंद केली. ठाण्यातल्या कळवा आणि पंढरपूरच्या मशिदींनी आपणहून भोंगे खाली उतरवले आहेत.
तर राज्यातल्या बहुतांश मशिदी आणि मंदिरांना भोंग्याची परवानगी हवी आहे. त्यामुळे ट्रस्टींची पोलीस ठाण्यांमध्ये धावाधाव सुरू झालीये. मात्र यामुळे आधीच कायदा-सुव्यवस्थेचा ताण असलेल्या पोलिसांची डोकेदुखी वाढवलीये.