Mumbai : रगावमधील आरे कॉलनीत स्थानिक गुंडांकडून 10 विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला (Fatal Attack) करण्यात आल्याची घटना घडली आहे. आरे कॉलनीत (Aare Coloney) पार्टी करण्यासाठी गेलेल्या 10 विद्यार्थ्यांवर स्थानिक गुंडांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. पाच ते सहा गुंडांनी धारदार शस्त्रांनी या विद्यार्थ्यांवर (Student) हल्ला केला. यात काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. हल्ला करणारे स्थानिक गुंड असल्याची माहिती आहे. त्यांनी चॉपर आणि चाकूचा वापर करत हल्ला केला. रविवारी रात्री उशीरा ही घटना घडली. हल्लानंतर या गुंडांनी विद्यार्थ्यांकडून पैसे आणि इतर वस्तूंची लूट केली.
आरे कॉलनीतल्या रॉयल पाम परिसरात असलेल्या व्हिलामधअये हे विद्यार्थी पार्टी करण्यासाठी गेले होते. हल्ला झालेले सर्व विद्यार्थी बी.कॉमचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्याची माहिती मिळताच आरे पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला. आतापर्यंत पोलिसांनी तीन गुंडांना अटक केली आहे. त्यांच्यावर कलम 326 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. चॉपर आणि चाकूने हल्ला केल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या हातावर, पाठीवर, डोक्यावर आणि छातीवर खोल जखमा झाल्या आहेत. या घटनेने विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हल्ला करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे.
बँक कर्मचाऱ्यांना अटक
दरम्यान दुसऱ्या एका घटनेत, शेयर्स खरेदी विक्री ट्रेडिंगच्या नावाखाली जास्तीचा नफा होत असल्याचे अॅपवर दाखवून तब्बल 33 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नवी मुंबई सायबर पोलिसांनी उल्हासनगरमधील इंडसइंड बँकेच्या आजी माजी अधिकाऱ्यांना अटक केली आहे. गुन्हा करताना वापरलेले बँक खाते, मोबाईल क्रमांक याचा सखोल तांत्रिक तपास करत प्रवीणकुमार मिश्रा आणि अशोक चौहान या आरोपीना अटक करण्यात आलीय.
अटक केलेल्या आरोपीकडून 4 मोबाईल, 8 सिमकार्ड, 7 डेबिट कार्ड, 2 चेकबुक, 3 पासबुक आणि 6 रबरी स्टॅम्प जप्त करण्यात आलेत. फसवणूक केलेली रक्कम भरलेले बँक खाते गोठवून त्यातील 15 लाख रुपये गोठविण्यात सायबर पोलीसांना यश आलेय. सदर आरोपीनविरोधात 4 सायबर तक्रारी असून नवी मुंबई सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत