Digital Arrest Case In Mumbai: 'डिजीटल अरेस्ट' या नव्या प्रकारच्या सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकरण मुंबईमधून समोर आलं असून या प्रकरणात अंधेरी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. या प्रकरणात एका 26 वर्षीय तरुणीला आर्थिक गंडा घालण्यात आला आहे. तसेच आपण दिल्ली पोलीस दलातील अधिकारी असल्याचं सांगून या तरुणीला एका हॉटेल रुममध्ये व्हिडीओ कॉल सुरु असतानाच नग्न होण्यास भाग पाडण्यात आलं. पीडित महिला ही एका औषध निर्मिती कंपनीत कामाला असून मूळची बोरीवलीची रहिवाशी आहे. या महिलेला सायबर गुन्हेगारांनी 1 लाख 78 हजार रुपयांचा आर्थिक गंडाही घातला. नरेश गोयल मनी लॉण्ड्रींग प्रकरणामध्ये तुमचं नाव समोर आल्याचं सांगत या महिलेची आधिक फसवणूक करुन नंतर तिला कॅमेरासमोरच कपडे काढण्यास भाग पाडण्यात आलं.
अंधेरी पोलिसांनी 28 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता दाखल केलेल्या एफआयआरनुसार, हा सारा प्रकार 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी घडला. ही महिला अंधेरीमधील आपल्या ऑफिसमध्ये असताना सायबर गुन्हेगारांनी वेगवेगळ्या फोन नंबरवरुन या महिलेशी संपर्क साधला. अनेकदा तिला तिचं नाव मनी लॉण्ड्रींग प्रकरणात समोर आल्याचं सांगण्यात आलं. गुप्तचर विभागासाठी काम करत असल्याचं सांगत तुझं नाव उघड करु असा दावा करत तिला अटकेची धमकी देण्यात आली. त्यानंतर या महिलेला असं ऑफिसमध्ये असताना तुझ्याशी बोलता येणार नाही. तू एक हॉटेलची रुम बूक कर तिथून आपण बोलू असं सांगण्यात आलं.
घाबरलेल्या या महिलेने सायबर गुन्हेगारांनी सांगितल्याप्रमाणे एका हॉटेलमध्ये रुम बूक केली. त्यानंतर या सायबर गुन्हेगारांनी तिला व्हिडीओ कॉल केला. तुझ्या बँक खात्यावर पैसे आले आहेत की नाही हे तपासण्यासाठी त्यांनी बँक अकाऊंट व्हेरिफाय करण्याचा दावा करत या महिलेच्या बँक अकाऊंटवरील 1.78 लाख रुपयांवर डल्ला मारला. त्यानंतर हे गुन्हेगार एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी डिजीटल माध्यमातून या महिलेचं शोषणही केलं.
नक्की वाचा >> कंडोमच्या मदतीने लाखो रुपयांचा गंडा! 'तो' हॉटेल रुममध्ये चेक इन करायचा अन्...
बॉडी व्हेरिफिकेशनच्या नावाखाली या महिलेला व्हिडीओ कॉल सुरु असतानाच सगळे कपडे उतरवण्यास सांगण्यात आलं. व्हिडीओ कॉलवरच तिला कपडे काढून बॉडी व्हेरिफिकेशन करण्यास सांगण्यात आलं. अटकेच्या भितीने या महिलेने सायबर गुन्हेगारांचा कॉल सुरु असतानाचा सर्व कपडे काढले. त्यानंतर आरोपींनी व्हेरिफिकेशन झाल्याचं सांगून कॉल कट केला. सारा प्रकार आपली फसवणूक असल्याचं लक्षात आल्यानंतर आठवडाभराने या महिलेने तक्रार दाखल केली. या प्रकरणामध्ये पोलीस चौकशी करत असून अनोखळी संक्षयित आरोपीचा शोध घेत आहेत.