Ganeshotsav 2021 : मुंबईत जमावबंदीचा आदेश, पुढचे ९ दिवस असे असणार नियम

सणासुदीच्या काळात गर्दी होण्याच्या शक्यतेने मुंबई पोलिसांनी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत

Updated: Sep 9, 2021, 05:45 PM IST
Ganeshotsav 2021 : मुंबईत जमावबंदीचा आदेश, पुढचे ९ दिवस असे असणार नियम title=

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात यंदाही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. मुंबईत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. पुढचे नऊ दिवस मुंबईत कलम १४४ लागू असणार आहे. त्यामुळे कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. मुंबईत १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबरपर्यंत १४४ कलम लावण्यात आलं आहे.

सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, लोक बाहेर पडणार नाहीत आणि बाजारपेठेतही नागरिकांची गर्दी होणार नाही यासाठी पोलिसांना विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर नागरिकांनी ही स्वतः शिस्त पाळून पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन पोलिस आयुक्तांकडून करण्यात आलेला आहे. 

सार्वजनिक मंडळांना आगमन व विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक मंडळातील गणेशमूर्तीच्या प्रत्यक्षदर्शन व मुखदर्शनास सक्त मनाई करण्यात आली आहे. मंडळांनी ऑनलाइन, केबल नेटवर्क, फेसबुक, समाजमाध्यमे यांद्वारे दर्शनाची व्यवस्था करावी, असाही नियम घालण्यात आला आहे.

सार्वजनिक मंडळांबरोबरच घरी गणेशमूर्ती आणणाऱ्यांकरिता ही नियमावली बंधनकारक असणार आहे. घरगुती गणेशमूर्ती दोन फुटांपेक्षा, तर सार्वजनिक उत्सवातील मूर्ती चार फुटांपेक्षा उंच नसावी हा नियम कायम ठेवण्यात आला आहे.