Ghatkopar Hording Collapsed : मुंबईतल्या घाटकोपर परिसरात अवाढव्य होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. होर्डिंग क्रेन्सच्या साहाय्यानं काढण्याचा एनडीआरएफचा (NDRF) प्रयत्न अयशस्वी ठरलाय. होर्डिंग्सचं वजन जास्त असल्यानं ते मध्येच तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनडीआरएफच्या जवानांनी सरळ हँडकटरनी होर्डिंग काढायला सुरुवात केलीय. आधी 2 क्रेन्सच्या साहाय्यानं हे होर्डिंग उचलण्याचा प्रयत्न एनडीआरएफनं केला, मात्र त्यात यश आलं नाही. पेट्रोल पंपावर हे होर्डिंग असल्यामुळे याठिकाणी एनडीआरएफला गॅस कटर किंवा इलेक्ट्रिक कटरच्या साहाय्यानं होर्डिंग तोडता येत नाहीये. त्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होतोय. वर्षभरापूर्वी पुण्यात अवैध होर्डिंग पडून पाच जणांचा मृत्यू झाला होता.
भावेश भिडेवर गुन्हा दाखल
घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी होर्डिंग लावणा-या भावेश भिडे (Bhavesh Bhide) आणि इतरांविरोधात पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. भावेश भिडेवर 21 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भावेशने 2009 मधअये विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात 21 गुन्हे असल्याचं नमुद करण्यात आलं होतं. भावेशवर विनापरवानगी साईनबोर्ड लावल्याप्रकरणी 26 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भिडेवरुन राजकारण
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भावेश भिडेवरुन आता राजकारण सुरु झालंय. भाजपनं शिवसेना ठाकरे पक्षावर (Shivsena UBT) गंभीर आरोप केलेत. उद्धव ठाकरेंसोबतचा भावेश भिंडेंचा फोटो भाजप आमदार राम कदम यांनी ट्विट केलाय आणि तिखट सवाल उपस्थित केलेत. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते पुष्पहार देऊन भावेश भिंडेचा सत्कार केल्याचा फोटो राम कदम यांनी टाकलाय. तर भाजपचा हा आरोप राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळांनी खोडून काढलाय.. होर्डिंग दुर्घटनेशी उद्धव ठाकरेंचा काय संबंध? असा थेट सवालच भुजबळांनी विचारलाय..
महापालिका की रेल्वेची जागा?
मुंबईत जाहिरातीसाठी होर्डिंग किंवा बॅनर लावायचे असल्यास मुंबई महापालिकेची परवानगी आवश्यक असते. मुंबईत महापालिकेने एकूण 1025 बॅनर होर्डिंग्ज लावण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर 179 होर्डिंग्ज रेल्वे हद्दीत लावण्यात आलेत. त्याची पालिकेने परवानगी दिलेली नाही.म्हणजेच ते अनधिकृत आहेत.मुंबई महापालिकेच्या नियमानुसर 40 बाय 40 होर्डिंग्जची परवानगी आहे. घाटकोपरमधील दुर्घटना झालेलं होर्डिंग्ज हे 120 बाय 120 इतकं मोठं होतं. याला पालिकेने परवानगी दिलेली नव्हती.
दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश
होर्डिंग दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) दिलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपर दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी हे आदेश दिले. या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदतही मुख्यत्र्यांनी जाहीर केलीये.
दुर्घटनेला कोण जबाबदार?
शहरात होर्डिग लावण्यासाठी तिथली महापालिकेची परवानगी आवश्यक असते. महापालिका ही जबाबदारी खासगी एजन्सीकडे देते. या एजन्सीस शहरात कोणत्या जागेवर आणि कोणत्या ठिकाणी होर्डिंग लावायचे हे निश्चित करते. पावसाळ्यात किंवा वादळात मोठ-मोठाले होर्डिंग कोसळण्याचा धोका असतो. यामुळे मोठ्या दुर्घटना होऊ शकतो. अशा दुर्घटना झाल्यास त्या एजन्सीना ब्लॅकलीस्ट केलं जातं. काही प्रकरणात त्यांचं लायसन्सही रद्द केलं जातं. होर्डिंग कोसळून जिवीतहानी झाल्यास महापालिका किंवा होर्डिंग लावणाऱ्या एजन्सीविरोधात कारवाई होऊ शकते.
2023 मध्ये पुण्यातली घटना
याआधी 2023 एप्रिलमध्ये पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये अशीच मोठी दुर्घटना घडली होती. इथं होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर दोन जण जखमी झाले होते. मृतांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश होता. वादळी वाऱ्यामुळे काही लोक होर्डिंग खाली असलेल्या टायर पंक्चरच्या दुकानाच्या शेडखाली उभे होते. त्याचेवळी होर्डिंग कोसळलं. त्याआधी 2018 मध्ये पुण्यातील जूना बाजार परिसरात होर्डिंग कोसळून चार जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एका रेल्वे आणि पालिका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली होती.