Mumbai Western Railway Latest News: पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेने आपल्या मुख्यमार्गावरील एसी लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गर्दीत घामाघूम होणारा मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार आहे. येत्या महिन्यात पश्चिम रेल्वेवर 50 एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास गारेगार आणि आरामदायी होण्यास मदत होईल.
पश्चिम रेल्वे सध्या 96 एसी लोकलच्या फेऱ्या धावत आहेत. या फेऱ्यांमध्ये दररोज सरासरी 1.62 लाखांहून अधिक प्रवासी ये-जा करत असतात. चालू आर्थिक वर्षात एसी लोकलने 3 कोटींहून अधिक प्रवाशांनी आरामदायी आणि गारेगार प्रवासाचा अनुभव घेतला. एसी लोकलचा प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून आणि उन्हाळ्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी आणखी पाच एसी रेक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेकडे सध्या 7 एसीचे रेक असून आणखी 5 वातानुकूलित रेक सुरू केल्यास वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या 50 पर्यंत वाढवणे शक्य होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.
तसेच भारतीय रेल्वेतील पहिली एसी लोकल डिसेंबर 2017 मध्ये पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट –बोरिवली दरम्यान सुरू करण्यात आली. सुरुवातीला या एसी लोकलला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद दिला. पण हळूहळू एसी लोकलच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत गेली. तसेच तिकीट दर कमी केल्यानंतर पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलचे प्रवासी संख्या वाढू लागली. सध्या एसी लोकलमध्ये गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे एसी लोकलच्या संख्येत वाढ करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. त्याचपार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने एसी लोकलच्या फेऱ्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात एसी लोकलच्या प्रवासी संख्येत सुमारे 25 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात एसी गाडीतून 2.32 कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. पश्चिम रेल्वेवर सध्या 96 एसी लोकल आहेत. यात रोज सरासरी 1.62 लाखांहून अधिक जण प्रवास करतात. 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत 3.14 कोटी जणांनी प्रवास केला. त्यामुळे वातानुकूलित उपनगरी फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जात आहे.
मुंबईकरांची वाढती गर्दी पाहता एसी लोकल बरोबर चर्चगेट - विरारदरम्यान 15 डब्यांची धीमी लोकल सुरू करण्याचा विचार आहे. चर्चगेट - अंधेरीदरम्यानच्या फलाटांची लांबी वाढवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे लवकरच चर्चगेटवरून थेट विरारपर्यंत 15 डब्यांची धीमी लोकल धावेल. कारण प्रवाशांना सकाळ व सायंकाळच्या वेळी श्वास कोंडणाऱ्या गर्दीतून प्रवाशांना धक्काबुक्की सहन करून प्रवास करावा लागतो. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकलमधील प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी 15 डब्यांची धीमी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.