Mumbai Local News : मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. (Central Railway) मध्य रेल्वेची दोन्ही बाजूची वाहतूक जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरु आहे. लोकल सेवेसह लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही याचा फटका बसलाय. सकाळच्या वेळी ऑफिसला जाणाऱ्यांना याचा मोठा त्रास होत आहे. सकाळच्या वेळी दादर स्टेशनजवळील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने याचा फटका लोकल सेवेला बसला आहे.
दरम्यान, लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. पश्चिम रेल्वेवर 15 डब्यांच्या 150 फेऱ्या चालविण्यात येत आहेत. आता यात आणखी फेऱ्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत उतारा मिळणार आहे. सोमवारपासून आणखी 6 फेऱ्या सुरु करण्यात येणार आहे. तर रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना दणका दिला आहे. फुकट्यांकडून पश्चिम रेल्वेने 158 कोटी रुपये वसूल केले आहेत. वर्षभरात 28 लाख प्रवाशांनी विनातिकीट प्रवास केला.
दरम्यान, मुंबईत रविवारी उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. तिन्ही मार्गावर रुळाची देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मार्गावर ठाणे-कल्याण आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावर जोगेश्वरी-बोरिवली मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
मुंबईत रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक
मेगाब्लॉक कालवधीत ठाणे ते कल्याण आणि कुर्ला ते वाशीदरम्यान तसेच जोगेश्वरी ते बोरिवलीदरम्यान लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही लोकल फेऱ्या उशिराने धावणार आहेत. लोकल या 10 ते 15 मिनिटांनी उशिराने धावतील. तसेच अनेक गाड्या रद्द केल्याने आयत्यावेळी प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
तर ट्रान्स हार्बरवरील ठाणे-वाशी-नेरुळ स्थानकांदरम्यान लोकल नियमित सुरु राहणार आहेत. तसेच हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक कालवधीत वाशी, बेलापूर पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मेगाब्लॉकदरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल स्थानकादरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. मात्र, सीएसएमटी येथून पनवेल-बेलापूर आणि वाशीकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.