पश्चिम रेल्वेवर नवीन एसी लोकल दाखल झाली खरी, पण भाईंदर स्थानकात प्रवाशांना संताप अनावर, कारण...

Mumbai Local Train Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. अलीकडेच पश्चिम रेल्वेने एसी लोकलच्या 13 नवीन फेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र त्यावरुन प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 2, 2024, 02:00 PM IST
पश्चिम रेल्वेवर नवीन एसी लोकल दाखल झाली खरी, पण भाईंदर स्थानकात प्रवाशांना संताप अनावर, कारण... title=
mumbai local train update Commuters protest Bhayander’s regular Mumbai local train to AC service

Mumbai Local Train Update: मुंबई लोकल ही प्रवाशांसाठी लाइफलाइन आहे. नागरिकांचे संपूर्ण शेड्युल हे लोकलच्या वेळापत्रकावर अवलंबून असते. पश्चिम रेल्वेकडून अलीकडेच 13 एसी लोकलच्या फेऱ्या सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र त्यावरुन नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. एसी लोकलच्या सात फेऱ्या भाईंदर स्थानकातून सुरू होतात. या नवीन फेऱ्या सामान्य लोकलच्या ऐवजी ऐसी लोकलच्या चालवण्यात येत आहे. ज्यामुळं सामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. याविरोधात नागरिकांनी मोठं आंदोलन छेडलं आहे.

रेल्वेने सामान्य लोकलच्या जागी एसी लोकलच्या फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याचविरोधात भाईंदरच्या नागरिकांनी शुक्रवारी हस्ताक्षर अभियान छेडलं होतं. शनिवारीदेखील हे अभियान सुरू होतं. सकाळची 8.24 ची भाईंदर-चर्चगेट नॉन एसी लोकल एसीमध्ये बदलण्यात आल्याने तीव्र विरोध केला आहे. प्रवाशांनी म्हटलं आहे की, 8.24 वरुन भाईंदरवरुन सुटणाऱ्या लोकलनंतर थेट 9.35 ची लोकल आहे. त्यामुळं ऑफिसला पोहोचण्यासाठी खूप वेळ लागतो. सकाळी गर्दीच्या वेळी नॉन एसी लोकल हटवून त्या जागी एसी लोकल चालवणे हा सर्वसामान्य प्रवाशांवर अन्याय आहे. 

प्रवाशांनी रेल्वेच्या या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. प्रवाशांनी पश्चिम रेल्वेच्या जनरल मॅनेजरला पत्र लिहून नॉन एसी ट्रेन पुन्हा चालवण्यात यावी, अशी मागणी केली आहे. रेल्वे प्रशासन फक्त त्यांचा महसूलाकडे लक्ष देतेय. प्रवाशांची सुविधा आणि समस्येकडे लक्ष केंद्रित करायला हवं, पण ते होताना दिसत नाही. 

पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात मागील आठवड्यात एक नवीन एसी लोकल दाखल झाली आहे. 12 डब्यांच्या नवीन एसी लोकलमुळं 13 फेऱ्या वाढवण्यात आल्या. त्यामुळं सोमवारी ते शुक्रवार एसी लोकलच्या फेऱ्यांची संख्या 96 वरून 109 झाली. दररोज या नव्या एसी लोकलची पहिली फेरी सकाळी 8.30 वाजता भाईंदरहून सुटते. भाईंदर आणि चर्चगेट अशा 2-2 फेऱ्या चालवण्यात येतात.  एसी लोकलच्या डाउन मार्गावर 6 आणि अप मार्गावर 7 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. भाईंदर -अंधेरी, विरार-वांद्रे दरम्यान 1-1 फेरी चालवली येईल. डाउन मार्गावर चर्चगेट-विरार आणि चर्चगेट-भाईंदर, अंधेरी-विरार, वांद्रे-भाईंदर, महालक्ष्मी-बोरीवली आणि बोरीवली-भाईंदर दरम्यान 1-1 फेरी चालवण्यात येणार आहे.