मुंब्रा-कळव्यातील नागरिकांचा लोकल प्रवास 'फास्ट' होणार; 5 ऑक्टोबरपासून होणार मोठे बदल

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलचा प्रवास आता अधिक सूकर होणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी वेळापत्रकात बदल केले आहेत. काय आहेत ते बदल जाणून घेऊया. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 3, 2024, 07:28 AM IST
मुंब्रा-कळव्यातील नागरिकांचा लोकल प्रवास 'फास्ट' होणार; 5 ऑक्टोबरपासून होणार मोठे बदल  title=
mumbai local train update Fast Local will halt at Kalwa Mumbra station from 5th October

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलही प्रवाशांची लाइफलाइन आहे. लोकलचा प्रवास अधिक सुकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनही प्रयत्नशील आहे. सकाळी व संध्याकाळी ऑफिसच्या वेळेत लोकलला प्रचंड गर्दी असते. कधीकधी प्रवाशांना लोकलमध्ये चढायलादेखील मिळत नाही. त्यामुळं लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात यावा, अशी मागणी सातत्याने प्रवासी करत असतात. तसंच, मध्य रेल्वेनेही वेळापत्रकात बदल केले आहेत. तसंच, प्रवाशांसाठी आणखी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. 

मध्य रेल्वेच्या कळवा आणि मुंब्रा येथे जलद लोकलगाड्यांना आता थांबा मिळणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्यावेळी प्रत्येकी एक लोकलला थांबा मिळणार आहे. नवीन वेळापत्रकाप्रमाणे 5 ऑक्टोबर 2024पासून या गाड्यांना थांबा मिळणार आहे.  त्यामुळं या स्थानकातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

कळवा - मुंब्रा या रेल्वे स्थानकातून नियमित स्वरूपात आपल्या कामानिमित्त मुंबई येथे जाणाऱ्या लोकल प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्यावेळी धावणाऱ्या जलद लोकल गाडयांना मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने कळवा आणि मुंब्रा या स्थानकांमध्ये थांबा देण्यात आला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या नवीन वेळापत्रकाप्रमाणे ५ ऑक्टोबर २०२४ पासून या गाडयांना थांबा देण्यात येणार आहे.  

या गाडयांना थांबा

- कळवा रेल्वे स्थानकात सकाळी  ८.५६ वाजता अंबरनाथहून - मुंबईच्या दिशेने जाणारी जलद लोकल थांबेल 
- मुंब्रा रेल्वे स्थानकात सकाळी ९.२३ वाजता आसनगावहून - मुंबईच्या दिशेने जाणारी जलद लोकल थांबेल 
- कळवा रेल्वे स्थानकात सायंकाळी ७.२९ वाजता मुंबईहून बदलापूरच्या दिशेने जाणारी जलद लोकल थांबेल 
- मुंब्रा रेल्वे स्थानकात सायंकाळी ७.४७ वाजता मुंबईहून टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी जलद लोकल थांबेल 
त्याचप्रमाणे आता मुंबई सीएसएमटी वरून शेवटची कर्जत लोकल रात्री 12 वाजून 12 मिनिटांनी सुटेल तर शेवटची कसारा लोकल 12 वाजून 8 मिनिटांनी सुटेल.

पश्चिम रेल्वेवर चार तासांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव – कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गाचे काम करण्यासाठी गुरुवारी रात्री १२.३० ते शुक्रवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत अनेक लोकल रद्द करण्यात येणार असून काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत बोरिवली – अंधेरीदरम्यान सर्व जलद लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. या काळात लांबपल्ल्याच्या गाड्या १० ते २० मिनिटे उशिराने धावतील.