मुंबई : मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या एका क्रीडा मैदानाच्या नावावरुन महाविकास आघाडी सरकार आणि भाजपामध्ये नवा वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून या मैदानाचा काम करण्यात आलं आहे.
नेमका वाद काय?
मालाडच्या मालवणी परिसरातील या क्रीडा मैदानाचं वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल असं नामकरण करण्याचे प्रयत्न सत्ताधारी काँग्रेसकडून केले जात आहेत. याचा लोकार्पण सोहळा बुधवार, दि. 26 जानेवारी रोजी करण्यात येणार असल्याच्या आशयाचे फलक मालवणी परिसरात लावण्यात आले आहेत.
भाजपाचा तीव्र विरोध
क्रीडांगणाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरुन भाजपने तीव्र विरोध केला आहे. भाजप आमदार राम कदम यांनी यामुद्दयावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. जर ठाकरे सरकारच्या नेतृत्त्वात त्यांच्या मंत्र्यांनी मैदानाचं उद्घाटन केलं तर नाईलाजास्तव आम्हाला टिपू सुलतान नावाच्या फलकावर काळं पुसावं लागेल असा इशारा राम कदम यांनी दिला आहे.
हिंदुंचा नरसंहार करुन आमच्या मंदिरांना ध्वस्त करणाऱ्या आक्रमणकारी टिपू सुलतानचा सन्मान आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत खपवून घेणार नाही असं राम कदम यांनी म्हटलं आहे. हे कोणतं हिंदुत्व आहे, ज्यांनी हिंदुंवर अत्याचार केले, तेदेखील कबरीतून उठून शिवसेनेचा जयघोष करती, असा टोला राम कदम यांनी लगावला आहे.
विश्व हिंदू परिषदेचा इशारा
टिपू सुलतान सुल्तान हिंदू विरोधी होता. त्याने हिंदूंची अनेक मंदिरे उध्वस्त केली, हजारो हिंदूंचे धर्मांतरण केले तसंच अनेक हिंदूंची क्रूरपणे हत्या केली आहे. अशा क्रूर आणि हिंदू विरोधी टिपू सुलतानचं नाव क्रीडा मैदानास देण्यास आमचा विरोध आहे. हे नामकरण त्वरित थांबविण्यात यावं, असं निवेदन विश्व हिंदू परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे