कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेचा २०१९-२० सालासाठीचा अर्थसंकल्प आयुक्त अजोय मेहता यांनी सादर केलाय. अतिरिक्त महापालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्याकडे अर्थसंकल्पाची प्रत सादर केली. यावेळी महापालिका शिक्षण विभागानं तब्बल २७३३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलाय. त्यानंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पालिकेचा मुख्य अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केलाय. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना अर्थसंकल्पाची प्रत दिण्यात आली. मुंबई महानगरपालिकेचा २०१९-२० या वर्षांचा हा अर्थसंकल्प एकूण ३० हजार ६९२ कोटी रूपयांचा आहे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली होती... परंतु, त्याची अंमलबजावणी मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही.
मुंबईतील पाणी तुंबण्याच्या समस्येवर उपाय म्हणून...
- हिंदमाता पूरप्रवण क्षेत्रासाठी - ५३ कोटी
- नाल्यातील तरंगता कचरा थेट समुद्रात जाण्यापासून रोखण्याकरता तरंगते ट्रॅश बुम बसवणे - १.२० कोटी
- मॅनहोल संरक्षक झाकणांसाठी - १.२० कोटी
- गारगाई-पिंजाळ नदीजोड प्रकल्प - १२२.९० कोटी
- मिठी नदीच्या सौंदर्यीकरणासाठी - ११५ कोटी
- दहिसर, पोयसर, ओशिवरा नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ५.२० कोटी
- आरोग्य विभागासाठी ३६०१ कोटींची तरतूद
- तानसा मुख्य जलवाहिन्यांलगत सायकल मार्गिकेसाठी १२० कोटींची तरतूद
- अर्थसंकल्पीय अंदाजात विद्यमान करांमध्ये कोणतीही वाढ किंवा कोणतेही नवे कर प्रस्तावित नाहीत
- महापौरांचे नवे निवासस्थान शिवाजी पार्कात होणार असून त्यासाठी १ कोटी रूपयांची तरतूद... २७४५ चौमी जागेत होणाऱ्या या निवासस्थानाच बांधकाम यावर्षीच सुरू होणार
- देवनार इथं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीसाठी १०० कोटींची तरतूद
- मुलुंड क्षेपणभूमी बंद करण्यासाठी ४३ कोटींची तरतूद
- राणीबाग प्राणी संग्रहालय विस्तारीकरणासाठी ११० कोटी
- दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ५ कोटींची तरतूद
- मुंबईच्या 'विकास आराखडा २०१४ - २०३४'च्या अंमलबजावणीसाठी ३३२३ कोटी रूपयांची तरतूद
- गोरेगाव - मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद
- रस्ते विभागासाठी १५२० कोटी रूपये
- पूल विभागासाठी ६०० कोटी
- मुंबईची लाईफलाईन अर्थात 'बेस्ट'ला ३४.१० कोटी रुपयांची मदत करणार
- बेस्ट कर्मचाऱ्यांच्या निवासी वसाहत दुरूस्तीसाठी १० कोटी रुपयांची तरतूद
- महत्त्वकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पासाठी १६०० कोटी रूपयांची तरतूद
- एकूण ३० हजार ६९२ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर
- आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा उभारण्यासाठी २.६० कोटींची तरतूद
- भाषा कौशल्य समृद्ध करण्यासाठी १.३० कोटी खर्चून भाषा प्रयोगशाळेची उभारणी करणार
- टिंकर लॅबसाठी (थ्रीडी डिझाईन, प्रिटींग इलेक्ट्रॉनिक रोबोट बनविणे, मोबाईल ऍप विकसित करणे यांसारख्या गोष्टी शिकवल्या जातील) १.४२ कोटींची तरतूद
- नाबेट संस्थेद्वारे पालिका शाळांचा दर्जा व गुणवत्ता मूल्यमापन करण्यासाठी २० लाखांची तरतूद
- विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन वाढवून नैराश्य दूर करण्यासाठी समुपदेशन सेवा देण्यासाठी १ कोटींची तरतूद
- पूर्व आणि पश्चिम उपनगरात दोन ठिकाणी विज्ञान कुतूहल भवन उभारले जाणार असून यासाठी १.२० कोटींची तरतूद
- विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू देण्यासाठी १९.६० कोटींची तरतूद करण्यात आलीय. यामध्ये गणवेश, बूट, दप्तर, वह्या, रेनकोटसाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार तर इतर वस्तूंची रक्कम अनुदान स्वरूपात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणार
- खेळांच्या साधनासाठी २ कोटींची तरतूद
येत्या आर्थिक वर्षातही ज्या शैक्षणिक योजना सुरु राहतील, त्यांसाठी केलेली वाढीव तरतूद...
- सिसीटीव्ही कॅमेरा : शाळांमधील सुरक्षिततेसाठी सिसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी २४.३० कोटी रुपयांची तरतूद
- ई-लायब्ररी - १.३० कोटी
- डिजीटल क्लासरुम - प्राथमिक - ५.३३ कोटी, माध्यमिक - २.९१ कोटी
- टॉय लायब्ररी - ७.३८ कोटी
- मिनी सायन्स सेंटर्स - ६६ लाख
- महापालिका शाळांची वेगळी ओळख विशिष्ठ रंगांद्वारे होणार, महापालिका शाळांना विशिष्ठ ओळख प्राप्त व्हावी यासाठी तपकिरी - पिवळा या रंगाचा संगम असलेली रंगरंगोटी होणार, यासाठी २०१.७३ कोटींची तरतूद
- दिव्यांग विद्यार्थी-पालक उपस्थिती भत्ता - ३.८ कोटी
- व्हर्च्युअल क्लासरुम - व्हिटीसीद्वारे तज्ज्ञ शिक्षकांचे व्याख्याने आयोजित केले जाणार : प्राथमिक - १०.४४ कोटी, माध्यमिक - ६.४८ कोटी
- महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पेंग्विन दर्शन
- शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक सहल आयोजित करण्यात येणार. ही सहल राजमाता जिजामाता उद्यानात पेंग्विन बघायला जाणार