Mumbai News : देशाचा अर्थसंकल्प (Budget 2024) सादर झालेला असतानाच त्यामागोमाग आता मुंबई महानगरपालिकेकडूनही आगामी वर्ष, 2024 - 25 साठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. आगामी महानगरपालिका निवडणूक केंद्रस्थानी ठेवत या अर्थसंकल्पामध्ये त्याच धर्तीवर काही महत्त्वाच्या तरतुदीसुद्धा करण्यात आल्या आहेत. यामध्ये शहरातील सागरी किनारा रस्ता अर्थात कोस्टल रोडसाठी पालिकेकडून तब्बल 2 हजार 900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
पालिकेच्या अर्थसंकल्पात नमूद केल्यानुसार मुंबई महानगरपालिका बजेट 2024-25 मध्ये बेस्ट उपक्रमास अनुदान 928.65 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पालिकेच्या या अर्थसंकल्पामध्ये शिक्षण बजेटमध्ये मागील वर्षी अर्थात 2023-24 मध्ये 3027.13 कोटींची तरतूद होती, यंदाच्या वर्षी 2024-25 मध्ये हा आकडा वाढवून 3167.63 कोटी करण्यात आला आहे.
मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प/ कोस्टल रोडच्या वर्सोवा ते दहिसर टप्प्यासाठी पालिकेच्या वतीनं २ हजार 960 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, आगामी निवडणुकीच्या धर्तीवर ही तरतूद आणि एकंदरच हा प्रकल्प एक मोठी भूमिका बजावणार आहे.
सध्याच्या घडीला मरीन लाईन्स ते वरळीपर्यंत कोस्टल रोड वाहतुकीसाठी तयार असून, आता लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पुढील टप्प्याची तयारीही वेगानं सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
पश्चिम मुंबईत असणाऱ्या वर्सोव्यापासून उत्तर मुंबईतील दहिसरपर्यंत हा कोस्टल रोड उभारण्यात येणार असून, हा मार्ग गोरेगाव मुलुंड लिंक रोडलाही जोडण्यात येणार आहे. ज्यामुळं पश्चिम उपनगरांमधून पूर्व उपमगरापर्यंत सहजपणे पोहोचता येणार आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकूण 6 टप्प्यांमध्ये कोस्टल रोडचा हा भाग तयार करण्यात येणार आहे.
कोणत्या 6 मार्गांमध्ये विभागण्यात येणार कोस्टल रोडचा हा टप्पा?