Mumbai University Graduation Result: मुंबई विद्यापीठाने 2023-24 या शैक्षणिक वर्षाच्या उन्हाळी सत्राच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा मार्च - एप्रिल मध्ये घेऊन त्यांचे निकाल मे महिन्यातच जाहीर केले. हे सर्व 22 पदवी परीक्षांचे निकाल विक्रमी वेळेत म्हणजे 30 दिवसाच्या आत जाहीर केले आहेत. यामुळे मुंबई विद्यापीठाने 1 लाख 25 हजार विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. महाराष्ट्रात मे महिन्यात महत्वाच्या पदवी परीक्षेचे निकाल जाहीर करणारे मुंबई विद्यापीठ हे एकमेव ठरले आहे.
उन्हाळी सत्रात पदवीच्या अंतिम सत्र परीक्षांचे निकाल 30 दिवसाच्या आत जाहीर झाले. यात बीकॉम, बीए, बीएससी,बीएमएस,बीए एमएमसी, बीएससी आयटी, बीआर्किटेक्चर या महत्वाच्या परीक्षा बरोबर एकूण 22 पदवी परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत.
मुंबई विद्यापीठातून दरवर्षी 10 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षणासाठी जात असतात. परदेशी उच्च शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया चार ते पाच महिने आधीपासूनच सुरू असते त्यामुळे विद्यार्थ्यांना जून महिन्यात निकालाची आवश्यकता असते कारण निकालानंतर त्यांना महाविद्यालयातून ट्रान्सस्क्रिप्ट घेऊन वर्ल्ड एज्युकेशन सर्व्हिसमार्फत परदेशातील विद्यापीठात पाठवायचे असते. पदवीचे निकाल लवकर जाहीर झाल्याने परदेशी उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाने दिलासा दिला आहे. तसेच भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी व नोकरीसाठी देखील विद्यार्थ्यांना लवकर निकाल जाहीर झाल्याचा फायदा झाला आहे.
जून महिना हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो या काळात विद्यार्थी पुढील करियर करण्यासाठी सज्ज असतो अशावेळेस त्याला त्याच्या पदवी निकालाची आवश्यकता असते. मुंबई विद्यापीठाने यावर्षी जाणीवपूर्वक नियोजन केले. उन्हाळी सत्राचे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्रकुलगुरू डॉ.अजय भामरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे, कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, विशेष सल्लागार डॉ. प्रसाद कारंडे तसेच मार्गदर्शक माजी प्रकुलगुरू डॉ. नरेशचंद्र, माजी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. टि. ए. शिवारे, माजी कुलसचिव डॉ. एम.एस.कुऱ्हाडे यांनी विशेष लक्ष दिले. प्राचार्यांच्या बैठका घेतल्या, लीड कॉलेजच्या प्राचार्यांना नियमित सूचना दिल्या, मूल्यांकनाचा नियमित आढावा घेतला यामुळे निकाल वेळेत जाहीर झाले.
परीक्षा झाल्यानंतर त्या त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिका तत्काळ आणून त्या स्कॅनिंगला देऊन शिक्षकांना तपासणीसाठी उपलब्ध करून दिले. यामध्ये परीक्षा विभागातील कॅप विभागाचे उपकुलसचिव संतोष सोनवणे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी रात्री 12 तर कधी कधी 2 वाजेपर्यंत कार्य केले आहे. निकाल कक्षातील उपकुलसचिव नरेंद्र खलाने व त्यांच्या सर्व विद्याशाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निकालातील सर्व त्रुटी दूर करून निर्दोष निकाल जाहीर केले. मूल्यांकन झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे सर्व गुण आल्यानंतर त्यावर प्रक्रिया करून विद्यापीठाच्या नियमानुसार वेगवेगळे अध्यादेश लावून सीसीएफ विभागाने निकाल जाहीर केले.यात डिआयसीटीचे संचालक डॉ. प्रवीण शिनकर, सिस्टीम ऑपरेशन ऑफिसर्स भास्कर बेंडाळे, प्रवीण म्हात्रे व संजय बुगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे सर्व निकाल रात्री उशिरापर्यंत उपस्थित राहून जाहीर केले.