मुंबई : एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबईत दाखल झालेले भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील राजकीय पेचावर भाष्य केलंय. 'अजूनही वेळ गेलेला नाही. अजूनही चर्चा होऊ शकते' असं सांगत नितीन गडकरी यांनी अजूनही शिवसेनेशी चर्चेची तयारी बोलून दाखवलीय. याचवेळी, अडीच - अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटण्याबद्दल भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी कधीही दिलं नव्हतं याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. विशेष म्हणजे, भाजपासोबतच आणि शिवसेनेच्याही नेत्यांच्या संपर्कात असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलंय.
'याबद्दल माझं पक्षाध्यक्षांशी बोलणं झालं. अडीच वर्षांबद्दल कुठल्याही प्रकारचं आश्वासन भाजपाध्यक्षांनी शिवसेनेला दिलं नव्हत. लोकसभा निवडणुकीवेळी जेव्हा चर्चा झाली तेव्हा अडीच - अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल शिवसेनेनंच विषय मांडला. तेव्हा सध्या चर्चा थांबवू... आणि विधानसभेनंतर पाहू असं म्हणत बैठक संपवण्यात आली होती. नंतर बोलू याचा अर्थ आश्वासन दिलं असा होत नाही' असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं.
भाजपा - शिवसेनेची युती ही हिंदुत्वाच्या मुद्यावर आहे. अनैसर्गिक युती टिकत नाही... युती तोडायची की राखायची किंवा कुणासोबत युती करायची? हा सर्वस्वी शिवसेनेचा अधिकार आहे असं सांगतानाच 'अजूनही वेळ गेलेला नाही, अजूनही चर्चा होऊ शकते' असं म्हणत नितीन गडकरींनी एकप्रकारे शिवसेनेला पुन्हा एकदा चर्चेसाठी साद घातली.
'देशात ही सर्वात यशस्वी युती होती. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर.. त्यामुळे चर्चेतून काही मार्ग निघाला तर चांगलंच आहे' हे सांगायला गडकरी विसरले नाहीत
ज्या पक्षांसोबत विचारधारेवर आत्तापर्यंत शिवसेना लढली त्यांच्यासोबत सत्तेत जाणं योग्य नाही, असा सल्लाही नितीन गडकरी यांनी शिवसेनेला दिलाय.