मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन करण्यात आलं. लॉकडाऊनमध्ये सर्व धर्मीय प्रार्थनास्थळं भाविकांसाठी बंद करण्यात आली. आता टप्प्या-टप्प्याने राज्यात अनेक गोष्टी अनलॉक, हळू-हळू खुल्या केल्या जात आहेत. मात्र राज्यात अद्याप धार्मिक स्थळं खुली करण्यात आली नाहीत. त्यामुळे भाविकांसाठी मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार, देरासर अशी सर्व धार्मिक स्थळे खुली करावीत अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. रामदास आठवले यांनी या मागणीचे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.
मुस्लिम समाजाच्यावतीने रिपाईचे अल्पसंख्यांक आघाडी मुंबई अध्यक्ष हसन शेख आणि अनिस पठाण यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने रामदास आठवले यांना निवेदन देऊन मस्जिद सुरु करण्याची मागणी केली होती. नुकतंच मुंबई उच्च न्यायालयाने जैन धर्मियांना आठवड्यातून दोन दिवस देरासर सुरू करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती रिपाई अल्पसंख्यांक आघाडीच्या शिष्टमंडळाने रामदास आठवले यांना दिली.
त्यावर सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरु करण्याबाबत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत असल्याचं रामदास आठवले यांनी आश्वासन दिलं होतं. सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सुरू करावीत अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.